अहमदनगर : विधानसभेचे अध्यक्षपद मला मिळावं असं महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना वाटतंय असं महत्वपूर्ण वक्तव्य शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे. भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यावर बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, काँग्रेसकडे देखील असे भास्कर जाधव आहेत.
भास्कर जाधव यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे, त्यामुळे त्याला विशेष महत्व नाही. महाविकास आघाडीत अशी कुठलीही चर्चा नाही. भास्कर जाधवांनी त्यांच्या खुर्चीवर बसून चांगलं काम केलं. मात्र काँग्रेसकडे देखील असे भास्कर जाधव आहेत, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विधानपरिषद अध्यक्षपदावरुन सुरु असलेल्या दाव्यांवरुन महाविकास आघाडीत अध्यक्षपदावरुन रस्सीखेच सुरु आहे, हे दिसून येत आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद मला मिळावं असं तिन्ही पक्षांना वाटतंय: भास्कर जाधव
भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
विधानसभेचे अध्यक्षपद मला मिळावं असं महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना वाटत आहे. शिवसेनेच्या कोट्यातील वनमंत्री पद देऊन अध्यक्ष पद घेऊ नये असा सल्ला भास्कर जाधव यांनी दिला. शिवसेनेकडे वनखातं राहून जर अधिकचं विधानसभा अध्यक्षपद मिळत असेल तर ते स्वीकारावं असंही ते म्हणाले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात तालिका सभापती म्हणून काम करताना भास्कर जाधव यांनी गैरवर्तन करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केलं होतं. तसेच भाजपच्या अभिरुप विधानसभेतील माईक काढून घेण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई लोकलबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील
बाळासाहेब थोरात यांनी मुंबई लोकल सुरु होणार की नाही यावर बोलताना म्हटलं की, गर्दीमुळे कोरोना वाढतो तर दुसरीकडे कामाला जाणाऱ्या नागरिकांना होणारी गैरसोय आशा दोन बाजू आहेत. त्यामध्ये सुवर्णमध्य काढणं महत्वाचं आहे. यामध्ये मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील तो कदाचित कटूही असेल, परंतु तो निर्णय ज्यादा काळासाठी चांगला असेल.
सहकार बळकट करण्यासाठी या मंत्रालयाचा उपयोग व्हावा
केंद्रात नव्या सहकार मंत्रालयाच्या निर्मितीबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, केंद्र सरकारने सहकार मंत्रालय सुरू केलं मात्र त्याचा हेतू अद्याप समजलेला नाही. काही दिवसांनी सहकारी बँकेवर RBI चे नियंत्रण असणार असून चेअरमन देखील RBI च्या मान्यतेने येईल. परंतु हे सहकाराच्या तत्वाला धरून नाही, सहकाराचा आत्माच निघून जातो. अपेक्षा आहे सहकार बळकट करण्यासाठी या मंत्रालयाचा उपयोग व्हावा, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.