शेतकरी आंदोलनाचा फटका, पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा विस्कळीत
एबीपी माझा वेब टीम | 05 Jun 2017 04:43 PM (IST)
पिंपरी : शेतकरी संपाचं लोन अगदी पुण्यातील पवना धरणापर्यंत पोहचलं आहे. मावळ तालुक्यातील सर्व पक्षीयांनी मिळून पवना धरणातून पिंपरी चिंचवडला सोडलं जाणारं पाणी आज बंद केलं. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर मावळवासीयांनी शहराचा पाणी पुरवठा एक दिवसासाठी खंडित करण्याची मागणी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पवना धरण प्रशासनाने तत्परतेने त्यांची मागणी मान्य केली. परिणामी पिंपरी चिंचवडकरांचा पाणी पुरवठा एक दिवस विस्कळीत राहणार आहे. पवना धरणाचे अभियंते मनोहर खाडे यांनी याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी राज्यात पुकारलेल्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी आंदोलन अधिक तीव्र करत शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंद ठेवला आहे. शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. संबंधित बातम्या :