सोलापूर : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे पुन्हा एकदा सरकारचं धाबं दणाणलं आहे. कर्जमाफी आणि हमीभावाबाबत सरकार सकारात्मक असून शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे.


विरोधक शेतकरी आंदोलनाला फूस लावण्याचं षडयंत्र करत असल्याचा आरोप सुभाष देशमुख यांनी केला आहे. तसंच 20 वर्षाचं पाप धुवायला वेळ लागणार असल्याचं सांगत देशमुखांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच अनेकांची दुकानदारी बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या आडून डाव असल्याचंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कर्जमाफी आणि हमीभावाबाबत सरकार सकारात्मक आहे. चर्चेसाठी सर्व शेतकरी संघटना आणि प्रतिनिधींसाठी सरकारची दारं खुली असून शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन देशमुख यांनी केलं.

तसंच अल्पभूधारकांना दिलासा देण्यासाठी समिती स्थापन केल्याचंही सुभाष देशमुखांनी सांगितलं.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी कोणाच्याही हिताची नाही. नासाडी न करता अन्न गोरगरिबांना वाटावं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रकरणी सरकार संवेदनशील आहे. भाजपचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन संप मागे घेण्याचं आवाहन करणार असल्याचंही सहकारमंत्री म्हणाले.