मुंबई: शेतकरी संपाचं श्रेय कुणीही एकानं घेऊ नये असं आवाहन प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.


अल्पभूधारकांना कर्जमाफी ही मुख्यमंत्र्यांची खेळी आहे. शेतकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी राजकारण केलं तर मग तुमच्या सत्तेत नांगर घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

मुख्यमंत्री इतके लबाड बोलतात की त्याची हद्द नाही. शेतकाऱ्यांना सावरण्याऐवजी टवाळक्या करत असाल, तर शेतकरी तुमची टाळकी फोडल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम बच्चू कडूंनी दिला.

राज्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली हेच मोठं यश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  तसंच सदाभाऊंचा शेतातल्या बुजागणासारखा सरकारकडून वापर केला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

निव्वळ महाराष्ट्र बंद नाही तर साले म्हणणाऱ्या दानवेसारख्या वानरतोंडया माणसाला बंद करण्याची ताकद हा शेतकरी दाखवून देईल. हंसराज अहिर म्हणतो जीन्स पॅन्ट घालून शेतकरी आंदोलन करतात का, तर मग काय आम्ही चड्डीवर करायचं का? आम्ही जर कापूस पिकवला नाही तर यांना पण घालायला चड्डी राहणार नाही हे विसरू नये, असा हल्लाबोलही बच्चू कडू यांनी केला.

मोदी म्हणतात 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देऊ, पण आधी हमी भाव तर द्या, असा टोला बच्चू कडूंनी लगावला.

सुकाणू समिती

नाशिकला 8 तारखेल सुकाणू समितीची परिषद होईल आणि शेतकरी आंदोलनाची पुढची रणनीती आखली जाईल. सुकाणू समितीच्या माध्यमातून एक नेतृत्व समोर आल्याशिवाय राहणार नाही. हे नवं नेतृत्त्व संपूर्ण देशाला दिशा देईल, त्याची ही सुरुवात आहे, असा आत्मविश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला.

सदाभाऊ खोतांचा बुजगावण्यासारखा वापर

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सरकारकडून शेतातल्या बुजगावण्यासारखा वापर केला जातोय. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांचं बुजगावणं काम करत नाही, त्यामुळे सदाभाऊंचं बुजगावण लावलंय, असा निशाणा बच्चू कडूंनी साधला.

शेतकरी नेत्यांना राजकीय महत्वकांक्षा असलीच पाहिजे. शेतकऱ्याच्या मुलाने आमदार -खासदासर व्हायचं नाही का, पण ती प्रामाणिक असली पाहिजे. या आंदोलनामागे असंतुष्ट आत्मे  आहे असं सरकारला वाटत असेलस तर मंत्रालयात शेतकऱयांना मारणारे आत्मे कोणाचे होते? सरकारनं आत्मपरिक्षण करावं, असा सल्ला बच्चू कडूंनी दिला.

संबंधित बातम्या

LIVE UPDATE : राज्यातील शेतकऱ्यांचा महाराष्ट्र बंद 

आम्ही शेतकरी संपात सहभागी नाही: माथाडी नेते 

कर्जमाफी, हमीभावाबाबत सरकार सकारात्मक, संप मागे घ्या : देशमुख 

शेतकरी आंदोलनासाठी 21 जणांची नवी सुकाणू समिती 

वऱ्हाडासह नवरदेव शेतकरी आंदोलनात सहभागी