Water storage in Maharashtra : सध्या राज्यात पाणीटंचाईची (water shortage) समस्या निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी डोक्यावर हंडे, घागरी दिसत आहेत, तर काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरु झाले आहेत. दरम्यान, सध्या राज्यातील पाणीसाठा (Water storage) हा 28 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर मराठवाड्यातील (marathwada) पाणीसाठा 12 टक्क्यांवर आला आहे. अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे.
जायकवाडीत फक्त 7.74 टक्के पाणीसाठा शिल्लक
राज्यातील पाण्याची समस्या गंभीर होत आहे. पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण वाढत्या उष्णतेमुळं पाण्याची मागणी वाढत आहे. तसेच धरणातील पाणीसाठ्यात देखील झपाट्यानं घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मराठवाड्यात गंभीर स्थिती निर्माण झालीय. सध्या जायकवाडीत फक्त 7.74 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात निम्म्याहून अधिक धरण भरलेलं होतं.
या जिल्ह्यातील धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा
बीड, धाराशीव आणि लातूरमध्ये अनेक छोट्या आणि मध्यम स्वरुपाच्या धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील धरणसाठा 23 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याचवेळी जलसाठा 30 टक्के होता. दरम्यान, कोयना धरणात 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोयनेतून होणाऱ्या वीजनिर्मीतीत देखील घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील मे महिन्यात 30.43 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. तर गंगापूर धरणात 44 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसरीकडं भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणातील पाणीसाठा 25 टक्क्यांच्या खाली आहे.
विदर्भातील धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा
दरम्यान, विदर्भासाठी दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे विदर्भातील धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. त्यामुळं नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. नागपूर विभागात जलसाठा 40 टक्क्यांवर तर अमरावती विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा 44 टक्क्यांवर आला आहे. तर कोकणातील पाणीसाठा 42 टक्क्यांपर्यंत खाली उतरला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Marathwada Water Crisis : मराठवाड्यात फक्त 17 टक्के पाणीसाठा शिल्लक; अनेक भागात भीषण पाणीटंचाई, तीन प्रकल्प कोरडेठाक