Prasad Oak : अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) याने 'धर्मवीर' सिनेमात साकारलेली आनंद दिघे यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. त्यातच आता लवकरच 'धर्मवीर-2' हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या सिनेमानंतर अभिनेता प्रसाद ओक बराच चर्चेत आला होता. कारण या सिनेमानंतर राज्याच्या राजकारणात ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा संबंध या सिनेमाशी लावला जात असल्याचं चित्र होतं. पण आता पुन्हा एकदा प्रसाद ओकच्या एका वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.
प्रसाद ओकने नुकतच कॉकटेल स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. मराठी सिनेमांना प्राईम टाईम मिळत नाही, ही मराठी कलाकारांची अनेक वर्षांपासूनची खंत आहे. यावर प्रसाद ओकनेही त्याचा राग व्यक्त केला आहे. मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाहीत, प्राईम टाईमसाठी भीक मागावी लागते, यासाठी त्याने मल्टिप्लेक्सवाल्यांनाच जबाबदार धरलं आहे. तसेच ही परिस्थिती केवळ शिंदे सरकारच बदलू शकते, असा विश्वास देखील त्याने व्यक्त केला आहे.
राज ठाकरेंनी आंदोलनं केलीत पण... - प्रसाद ओक
मराठी सिनेमा हिंदी सिनेमाशी स्पर्धा का करु शकत नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रसाद ओकने त्याचं स्पष्ट मत मांडलं. त्याने म्हटलं की, ही परिस्थिती वाईटच आहे. पण स्पर्धा करु शकत नाही असं नाही. हिरकणी समोर चार हिंदी सिनेमे होते. ते चारही पडले पण हिरकणी सुपरहिट चालला. चंद्रमुखी, धर्मवीर आणि हंबीरराव हे बॅक टू बॅक मराठी सिनेमे सुपरहिट ठरले. या सिनेमांसमोर एकही हिंदी सिनेमा चालला नाही. पण मुद्दा हा लहान चित्रपटांचा आहे. जे छोटे चित्रपट आहेत, त्यांना थिएटर मिळत नाही आणि ही मल्टिप्लेक्स वाल्यांची मुजोरी आहे, ज्याबद्दल वारंवार बोललं गेलं आहे. वारंवार त्याबद्दल आंदोलनं झाली आहे. खळखट्याक सारखं आंदोलन राज ठाकरेंनी केलं. वारंवार राज ठाकरेंसारखा नेता हा मराठी सिनेमांसाठी धावून आलेलाच आहे. हे मान्य करायलाच हवं.
शिंदे सरकारचं त्यांचा हा माज उतरवेल - प्रसाद ओक
पण तरीही येणारं सरकार त्यावर कोणतंही ठोस पाऊल उचलत नाहीये, हे ही तितकचं खरंय. महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमांना प्राईम टाईम मिळायलाच हवा. तो आमचा हक्क आहे, त्याच्यासाठी आमच्यावर भीक मागण्याची वेळ येऊ नये. पण त्याच्याकडे ज्या सरकारचं लक्ष जाईल, जे सरकार यावर एखादा अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. पण ही मल्टीप्लेक्सवाल्यांची मुजोरी आहे की, त्यांना हिंदीमध्ये जास्त कलेक्शन मिळतं, म्हणून प्राईम टाईमचे शो त्यांना, हिंदी सिनेमांचे जास्त शो. हा त्यांचा माज आहे. कोणतरी कुठलंतरी सरकार येईल आणि त्यांचा हा माज उतरेल. मी आशा करतो की, शिंदे सरकारच त्यांचा हा माज उतरवेल. तेच काहीतरी त्याच्यावर तोडगा काढतील. पण अशी वाटतेय. मराठी सिनेमांसाठी निर्मात्यांना वारंवार भीक मागायला लागतेय, हे चित्र चांगलं नाही, असं प्रसाद ओकने म्हटलं.