हिंगोली : मराठवाड्यातील अनेक भागात मागील दोन-तीन दिवसात जोरदार पावसाने हजेरी (Monsoon) लावली आहे. मात्र या दमदार पावसानंतर देखील मराठवाड्यातील टँकरची संख्या काही कमी होत नसल्याचं चित्र आहे. आजही मराठवाड्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मराठवाड्यात आजही 1 हजार 980 गाव वाड्यांवर तब्बल 2 हजार 24 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
मराठवाड्यात आजही टँकरने पाणीपुरवठा
दुष्काळी मराठवाड्यात यावर्षी मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला. छत्रपती संभाजीनगरसह सर्वच मराठवाड्यात हा पाऊस धो-धो बरसला. पहिल्याच पावसात नद्या-नाले ओसंडून वाहू लागले. काही ठिकाणी तर नद्यांना पूर देखील आला. एवढंच काय तर धबधबे देखील कोसळू लागले. त्यामुळे पहिल्याच पावसात मराठवाड्यात पाणी-पाणी झालं. पण एकीकडे असे चित्र असतांना आजही मराठवाड्यातील टँकरची संख्या मात्र, काही कमी झालेली नाही. त्यामुळे ही टँकर लॉबी तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्यात 10 टँकर सुरू
हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊनही टँकरची संख्या मात्र कमी होत नाही. हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात एकूण दहा टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. जिल्ह्यातील पवार तांडा नावाच्या गावात सुद्धा संपूर्ण उन्हाळ्यात टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. जून महिना लागून जवळपास 10 दिवस झाले. चांगला दमदार पाऊस होऊन सुद्धा पाणीटंचाई कायम आहे. टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जातोय. गावात दररोज टँकर येतो आणि त्या टँकरमधून प्रत्येक घराला 15 घागर पाणी मिळतं आणि याच पाण्यामधून पिण्याचे वापरण्याचं यासह इतर कामासाठी लागणाऱ्या पाण्यात सुद्धा व्यवस्थापन केलं जातं. पावसाळा सुरू झाल्यानंतर ही टंचाई भासणार नाही, असं नागरिकांना वाटत होतं, परंतु पाणीटंचाईच्या झळा अजूनही नागरिकांना सोसाव्या लागतात.
मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात किती टँकर सुरू आहे?
कोणत्या जिल्ह्यात किती टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे?
छत्रपती संभाजीनगर :
555 गाव वाड्यांवर 741 टँकर सुरू
जालना :
475 गाव वाड्यांवर 542 टँकर सुरू
बीड :
739 गाव वाड्यांवर 468 टँकर सुरू
परभणी :
32 गाव वाड्यांवर 33 टँकर सुरू
हिंगोली :
10 गाव वाड्यांवर 10 टँकर सुरू
नांदेड :
40 गाव वाड्यांवर 39 टँकर सुरू
धाराशिव :
102 गाव वाड्यांवर 150 टँकर सुरू
लातूर :
47 गाव वाड्यांवर 41 टँकर सुरू
गेल्या काही वर्षात मराठवाडा दुष्काळ आणि टँकर हे एक जणू समीकरण बनलं आहे. यातूनच टँकर लॉबी सारखा प्रकार समोर आल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. त्यामुळे धो धो पाऊस पडूनही कागदावरचा मराठवाड्यातील दुष्काळ कधी मिटणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.