अहमदनगर: हिंदू धर्मात आलेल्या शिवराम आर्य यांनी मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पुन्हा मुस्लिम धर्मात जाण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक अडचण असल्याने आणि कागदपत्रांच्या अडचणींमुळे शिवराम आर्य यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, 'एबीपी माझा'ने ही बातमी दाखवतात त्या बातमीचे दखल घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शिवराम आर्य (Shivram Arya) यांच्या मुलीची शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच त्यांच्या मदतीसाठी भाजप नेते नितेश राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील धावून आल्याचे त्यांनी सांगितले आहे.


गेल्यावर्षी छत्रपती संभाजी नगर येथे एका मोठ्या सोहळ्यात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम महाराज यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील एका संपूर्ण मुस्लिम कुटुंबाने हिंदू कुटुंबात प्रवेश केला होता. मात्र  धर्मांतर केल्यानंतर केवळ 215 दिवसातच हे संपूर्ण कुटुंब पुन्हा मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करण्याच्या मानसिकतेत होते आणि त्याचं कारण होतं शिवराम आर्य यांची आठ वर्षांची मुलगी अश्विनी आर्य. अश्विनी आर्य हिच्या मेंदूमध्ये गाठ झाल्याने तिच्यावरती एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे , मात्र दुसरी शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास साडेचार लाख रुपये खर्च येणार आहे. 


शिवराम आर्य यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांच्यासमोर मुलीची शस्त्रक्रिया कशी करावी असा प्रश्न होता. त्यांच्या कागदपत्रांवर काही ठिकाणी मुस्लिम नाव आहे तर काही ठिकाणी हिंदू नाव आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देखील घेता येत नव्हता. त्यामुळे आपण पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश केला तर निदान आपल्या रक्ताचे नातेवाईक आपल्या मदतीला येतील अशी त्यांना अपेक्षा होती. याबाबत एबीपी माझाने बातमी प्रसारित करताच शिवराम आर्य यांच्या मदतीसाठी अनेकजण धावून आलेत. अश्विनी आर्य हिच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाणार असल्याचे आश्वासन शिवराय आर्य यांना देण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून देखील आपल्याला फोन आल्याचं शिवराय आर्य सांगतात. भाजप नेते नितेश राणे यांनी देखील मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे आर्य यांनी म्हटले आहे. केवळ मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पुन्हा एकदा धर्म परिवर्तन करण्याच्या मानसिकतेत असलेल्या कुटुंबाने आपला निर्णय बदलत हिंदू धर्मातच राहण्याचा निर्णय घेतला सोबतच मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत होणार असल्याने त्यांनी एबीपी माझाचे आभार मानलेत.


आणखी वाचा


घरवापसी! बागेश्वर धामच्या दरबारात जमीर शेख कुटुंबीयांनी स्वीकारला हिंदू धर्म