Washim Crime News : वाशिम जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. वाशिममध्ये तरुणींसोबत छेडछाड घडल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावरून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सध्या छेडछाडीच्या घटना वाढत चालल्या आहेत. छेड काढल्याची पोलिसात तक्रार दिल्याने आरोपींनी पीडितेच्या पित्यावर तीन वेळा जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. वारंवार पोलिसात तक्रार करुनही पोलीस कारवाई करत नाही म्हणून पीडितेच्या वडीलांनी थेट जखमी अवस्थेतच जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय गाठलं.


कारंजा येथे गावगुंडांनी एका मुलीची छेड काढली. यानंतर पीडितेच्या वडीलांनी पोलिसांत तक्रार दिली म्हणून गावगुंडांनी पीडितेच्या वडीलांना गाठत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांनी सात-आठ जणांनी मिळून मारहाण केल्याचा आरोप पीडितेच्या वडीलांनी केला आहे. पोलिसात तक्रार दिल्यामुळे मुलीची छेड काढणाऱ्या आरोपी मोहित अहेराव, भावेश ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलीच्या पित्याला तीन वेळा बेदम मारहाण केली आहे. याची तक्रार पोलिसात दिल्यानंतर कारंजा पोलीस आरोपीवर कारवाई करत नसून आर्थिक फसवणूक करत असल्याचा आरोप करून मुलीच्या पित्याने केला आहे. जखमी अवस्थेत थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पीडितेच्या वडीलांनी आपली व्यथा मांडली. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


काही दिवसांपूर्वी कारंजा येथे काही जणांनी तरुणीची छेड काढली. याची माहिती पीडितेने कुटुंबियांना दिली. त्यानंतर पीडितेच्या वडीलांनी कारंजा पोलीस स्थानकात आरोपींविरोधात तक्रार दिली. मात्र या गाव गुंडांच्या विरोधात तक्रार दिल्याचा राग ठेवत आरोपींनी पीडितेच्या वडीलांवर जीवघेणा हल्ला केला. पीडितेच्या वडीलांवर आतापर्यंत तीन वेळा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यात तीन वेळा पीडितेच्या वडीलांवर गावगुंडांनी हल्ला केला आहे. वारंवार पोलिसांकडे तक्रार करुनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप पीडितेचे वडील आणि नातेवाईकांनी केला आहे. 


पीडितेच्या वडीलांनी सांगितलं की, आरोपी मोहित अहेराव आणि भावेश ठाकूर यांच्याविरोधात छेडछाड केल्याची तक्रा नोंदवली म्हणून आरोपी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्यावर तीन वेळा हल्ला केला. कारंजा पोलिसांत वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. संविधानिक पद्धतीनं आपल्याला न्याय मिळावा आणि होणारे हल्ले थांबवेत, अशी मागणी पीडितेच्या वडीलांनी केली आहे. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी पैसे घेऊन आरोपींवर कारवाई करते, असं सांगत आपल्याला लुटल्याचा आरोपही पीडितेचे वडील आणि नातेवाईकांनी केला आहे.


दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारंवार घडणाऱ्या छेडछाडीच्या घटना, गावगुंडांची दहशत आणि पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित होत असलेलं प्रश्न यामुळे वाशिमची तुलना बिहारशी होऊ लागली आहे. यंदा स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. पण वाशिमसारख्या शहरात महिला सुरक्षित नाहीत. पोलीस तक्रारींना दाद देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आता तरी प्रशासन या प्रकरणात लक्ष घालून कठोर कारवाई करणार का हे पाहावं लागेल.