Prakash Ambedkar : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आरक्षणासाठी (Maratha Reservation) केलेल्या लढ्यानंतर अखेर या लढ्याला यश आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यादेशाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. मात्र त्याचा सर्वार्थाने राजकीय लाभ हा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे. या अध्यादेशामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मराठा समाजाचे टॉलेस्ट लीडर झाले असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केली आहे. तर देवेंद्र फडणवीस आणि बीजेपी हे ओबीसीमधून बाद झाले,अशी परिस्थिती आहे. त्यांच्यातील भांडणे लवकरच बाहेर येतील, असा विश्वास देखील प्रकाश आंबेडकर यांनी वाशीम येथे व्यक्त केला.


इतर मराठा नेते क्लीन बोल्ड


सरकारने घेतलेल्या निर्णयाचे विश्लेषण करताना आंबेडकर यांनी म्हटले की, सरकारने आता या अध्यादेशावर हरकती मागवल्या आहेत. हरकती किती येतात हे पाहले पाहिजे. त्यावर काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे आहे. हरकती नंतरच मराठा आरक्षणाविषयी अधिकृतरित्या बोलता येईल. सध्या त्याविषयी काही बोलता येणार नाही. मात्र मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलनाद्वारे ज्या मागण्या केल्या त्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आता स्ट्राँग मराठा लीडर म्हणून पुढे आले आहेत. शिंदेच्या भूमिकेमुळे इतर मराठा नेते हे क्लीन बोल्ड झाले असल्याचे देखील आंबेडकर यांनी सांगितले.


भुजबळ राजीनामा का देत नाहीत


मराठा आरक्षण विषयी छगन भुजबळ यांची जर भूमिका वेगळी असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा का देत नाहीत, असा प्रश्न देखील प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना विचारला. छगन भुजबळ हे कॅबिनेट मध्ये आहेत. एका बाजूला मंत्रिमंडळातील सर्व खायचे, मात्र दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने राहायचे. छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी आपला राजीनामा फेकून द्यावा, असे देखील आंबेडकर म्हणाले.  


उद्धव ठाकरे कोणाला घाबरतात माहिती नाही


उद्धव ठाकरे हे वंचित सोबत असलेल्या युतीबाबत उघडपणे का बोलत नाहीत, उद्धव ठाकरे कोणाला घाबरतात हे मला माहिती नाही, असे देखील आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये समावेश होण्याचा निमंत्रण आले आहे. आम्ही चर्चा करायला जाणार आहोत. या बैठकीसाठी मी न जाता आमच्या पक्षाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जातील, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.


इतर महत्वाच्या बातम्या