Manoj Jarange, Maratha reservation march : मराठा समाजाला  आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) नेतृत्वाखाली निघालेलं भगवे वादळ आता मुंबईच्या (Mumbai) वेशीवर येऊन ठेपले आहे. वाशीमध्ये मनोज जरांगे यांची भव्य सभा होणार आहे. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्याआधी राज्य सरकारकडून तोडगा काढण्यासाठी दोन जणांचं शिष्टमंडळ पाठवण्यात आले. मनोज जरांगे आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याआधीच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं महत्वाचं विधन समोर आले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेय. एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंशी संवाद, योग्य ते समाधान येईल असे सूचक विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही केलेय. 


कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या - देवेंद्र फडणवीस 


Maratha reservation march : न्यायालयाने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. 


उच्च न्यायालयाने आम्हाला जे निर्देश दिले आहेत, कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन शांततेने आणि नियमाने झालं पाहिजे असे उच्च न्यायालयाने सांगितले. न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे  तंतोतंत पालन करू. त्यासोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील. याकरिता माननीय मुख्यमंत्र्यांचे नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.



एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंशी संवाद, योग्य ते समाधान येईल - चंद्रकांत पाटील


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांच्याशी संवाद ठेवून आहेत, त्यातून त्यांचे योग्य ते समाधान होईल, असे विधान सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. सोलापुरात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला, यावेळी मनोज जरांगे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जारांगे यांच्याशी संवाद ठेवून आहेत, त्यातून त्यांचे योग्य ते समाधान होईल. जरांगे यांना कोर्ट, पोलीस यांनी ज्या सूचना करायचे आहेत, त्यांनी ते केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना आवाहन केलंय, ते योग्य निर्णय करतील असे मला वाटते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 


अजित पवार काय म्हणाले ?


पुण्यात ध्वजारोहण झाल्यानंतर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनीही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली. मराठी आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. नवी मुंबईत शिष्टमंडळ आहे . मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे. कुणी काय म्हटले ते मला सांगू नका? राज्य प्रमुखांनी त्यात लक्ष घातलं आहे, असे अजित पवार म्हणाले. 


आणखी वाचा :


आझाद मैदानावर आंदोलन करणारच, झेंडावंदनानंतर मनोज जरांगेंची भूमिका