Maharashtra Weather Monsoon News : राज्यातील  वातावरणात बदल (Climate Change) होत आहे.  पावसासाठी (Rain) पोषक वातावरण राज्यात तयार झालं आहे. नागरिक ज्या मान्सूनची (Monsoon) आतुरतेने वाट पाहत होते, तो मान्सून राज्यातील तळ कोकणासह मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील भागांमध्ये दाखल झाला असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख ( Panjabrao Dakh) यांनी दिली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे राज्यातील शेतकरी आनंदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाबराव डखांनी दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील 30 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.


10 जून पर्यंत मान्सून मुंबईमध्ये दाखल होणार 


हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. 6 जूनला दाखल झालेला मान्सून अजूनही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर मध्ये आहे. मात्र त्याच्या पुढील प्रवासासाठी खूपच पूरक परिस्थिती तयार झाली आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे येत्या तीन दिवसांनी म्हणजेच 10 जून पर्यंत मान्सून मुंबईमध्ये दाखल होणार आहे. दरवर्षी मानसून 11 जूनला मुंबईत येतो, पण यंदा एक दिवस आधीच राजधानी मुंबईत मान्सूनचे आगमन होणार असा अंदाज आहे.


राज्यातील 30 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता


मान्सून 10 जूनला मुंबईत दाखल झाल्यानंतर पुढे दोन ते तीन दिवसांनी अर्थातच 13 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्याची शक्यता तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे. दरवर्षी 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पसरत असतो. दरम्यान आज राज्यातील 30 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज तळ कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार मोसमी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित कोकण, संपूर्ण खानदेश, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


अद्याप राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सून दाखल झालेला नाही


दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी अद्याप राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सून दाखल झालेला नाही. अनेक जिल्ह्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, पुढच्या 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


महत्वाच्या बातम्या:


महाराष्ट्रात मान्सून दाखल मात्र, नाशिकमध्ये प्रतिक्षा कायम, पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर