Wardha News : वर्ध्यातील रसुलाबाद नजीक जंगल परिसर असल्याने येथील जंगलात काही जनावरे चराईसाठी गेली होती. दरम्यान, यातील गायी, म्हशी आदी जनावरांचा कळप जंगल परिसरात चरण्यासाठी गेला असता, त्यातील जवळपास 70 ते 80 जनावरांना विषबाधा (Poisoning)झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्वारीचे थोंब चारा खाल्ल्याने या चार्‍यातून ही विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक युवकांनी वेळीच धावपळ करत या सर्व जनावरांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने या सर्व जनावरांचे प्राण बचावले आहे. मात्र या घटणेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  


प्रसंगावधान राखल्याने वाचले जनावरांचे जीव


वर्ध्याच्या रसुलाबादमधील 70 ते 80 जनावरांचा कळप नेहमीप्रमाणे गावाजवळील जंगल परिसरात चरण्यासाठी गेली होती. त्यानंतर ही सर्व जनावरे अचानक आजारी पडत असल्याची माहिती काही पशुपालकांच्या लक्षात आली. त्या नंतर या घटनेची माहिती पशुपालक विवेक भबुतकर यांना दिली असता त्यांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आजारी असलेल्या तसेच विषबाधा झालेल्या जनावरांना त्वरित उपचार सुरू केले. सोबतच त्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकार्‍यांनाही दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्यानंतर त्यांनी विरुळ, रोहणा आणि आर्वी येथील वैद्यकीय अधिकार्‍यांची एक चमू रसुलाबादमध्ये दाखल झाली. या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळीच विषबाधा झालेल्या जनावरांवर उपचार करत त्यांचा जीव वाचविला. सध्याघडीला ही सर्व जनावरे सखरूप असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. रामेश्वर आढावू यांनी दिली. 


गोंदिया शहरालगतच्या तलावात हजारो माशांचा मृत्यू


गोंदिया येथील छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल रुक्माई मंदिर जवळील देवबोडी या तलावात अचानक मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परिणामी परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. या दुर्गंधीचा परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. छोटा गोंदिया परिसरात हा तलाव असून यामध्ये गोंदिया शहरातील दूषित पाणी जमा होतं.


मेलेल्या माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास


या तलावाच्या स्वच्छतेसाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रार देखील केली होती. स्थानिक नागरिकांच्या या तक्रारीवर नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाने अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज हजारो माशांचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिकांचे मत आहे. दरवर्षी या ठिकाणी अशाच प्रकारे माशांचा मृत्यू होतो. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना दुर्गंधीमुळे परिसरात राहणेही कठीण झाले आहे. त्यामुळे 24 तासात प्रशासनाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तर उपाययोजना झाली नाही तर उपोषण करण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या