Wardha Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्याची सांगता झाली आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रचाराचा मोर्चा हा पुढे होऊ घातलेल्या निवडणुकांकडे वळवला आहे. त्यामुळे जश-जशा या निवडणुका जवळ येत आहेत तसं-तसं अनेक सभा आणि बैठकांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. तर दुसरीकडे काही राजकीय गणिते जळवण्यासाठी देखील अनेक खलबतं आणि गाठीभेटींना सध्या उधाण आले आहे.


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अचानक वर्ध्याचे (Wardha) भाजपचे आमदार पंकज भोयर यांच्या म्हसाळा येथील निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती हाती आली आहे. अचानक झालेल्या भेटीमुळे मात्र अनेक तर्क-वितर्कांना सध्या उत आला आहे.  तडकाफडकी घेतलेल्या या भेटीमुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात काही मोठी राजकीय घडामोडी तर घडत नाहीये ना, अशी शंकाही राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.


उपमुख्यमंत्री अचानक वर्ध्यात आमदाराच्या भेटीला


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल आपला सुनिश्चित यवतमाळ दौरा आटपून नागपूरच्या दिशेने रवाना झाले होते. या प्रवासादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्याचे भाजपचे आमदार पंकज भोयर यांची त्यांच्या म्हसाळा येथील निवासस्थानी भेट घेतली आणि रात्री तेथेच मुक्काम केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सोबत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. काल, 21 एप्रिलला यवतमाळच्या तळेगाव येथे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा आटोपल्यानंतर भाजपच्या प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सोबतच या बैठकीमध्ये विरोधीपक्षातील काही नेते गळाला लागतात का, याची देखील चाचपणी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.


विरोधी पक्षातील नेता भाजपच्या गळाला? 


परिणामी, सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काही राजकीय समीकरणे जुळवता येतील का? या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्ध्याचे भाजपचे आमदार पंकज भोयर यांची तडकाफडकी भेट घेतली असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वर्ध्यात काँग्रेस अथवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कुठला नेता गळाला लावण्याचा प्रयत्न होत तर नाही ना? अशा चर्चांनी आता जोर धरला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या