मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की काही निर्बंध शिथिल होणार यावर चर्चा होणार आहे. मात्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असतानाही महाराष्ट्र सरकार राज्यव्यापी लॉकडाऊन आणखी एक आठवड्यापर्यंत वाढवण्याच्या विचारात असल्याचंही कळतं. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो याची उत्सुकता आहे.


राज्यात सध्या 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. सरकारने लागू केलेल्या या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख उतरणीला आल्यामुळे लॉकडाऊन उठवावा अशी मागणी व्यापाऱ्यांपासून नागरिक करत आहेत. आजच्या बैठकीत लॉकडाऊन संपूर्ण उठणार का, निर्बंध शिथिल होणार की लॉकडाऊन कायम राहणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.


दरम्यान लॉकडाऊनबाबत राज्य सरकार सध्या दोन प्रस्तावांचा विचार करत असल्याचं समजतं. पहिला प्रस्ताव म्हणजे 1 किंवा 7 जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉक करणं. परंतु राज्यातील अनलॉक प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये पार पडेल, असंही म्हटलं जात आहे. शिवाय मुंबई शहराचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनीही लॉकडाऊन एकदम उघडणार नाही, असं सांगितलं होतं. 


कशी असू शकते अनलॉकिंगची प्रक्रिया? 


- पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक दुकानं वगळता इतर दुकानं सुरु होऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया 1 जूनपासून करायची की 7 जूनपासून याबाबतचा अंतिम आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल.


- तर दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दुकानं सुरु करण्याची परवानगी दुसऱ्या टप्प्यात दिली जाईल, असं समजतं. मात्र ही दुकानं दिवसाआड सुरु राहतील.


- अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, मद्याची दुकानं निर्बंधासह उघडण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. हॉटेलांना 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी मिळू शकते.


- मात्र शाळा आणि महाविद्यालये तूर्तास बंद राहतील. तर मुंबई लोकल गाड्या अनलॉकच्या शेवटच्या म्हणजेच चौथ्या टप्प्यात पुन्हा सुरु होऊ शकतील असं कळतं.


राज्यात 50 टक्के लसीकरण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो : अस्लम शेख
"जोपर्यंत मुंबई शहर आणि महाराष्ट्रात 50 टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणताही दिलासा देणं हे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊनमध्ये कसा दिलासा देता येईल, काय नियम असतील, कोणत्या दुकानांना परवानगी देता येईल याचा विचार सुरु आहे. टास्क फोर्स याबाबत सूचना करतील. त्यानंतर कॅबिनेटमध्ये योग्य तो निर्णय घेऊन, यासंदर्भात घोषणा केली जाईल," असं मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं होतं.


रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात शिथिलता देण्याचा विचार : विजय वडेट्टीवार
महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हे संकेत दिले आहेत. 24 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या बघूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसंच "मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, पण संपलेला नाही. लोकल ट्रेन आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवल्या आहे आणि त्याचा परिणाम दिसत आहे. काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावे लागतील. सरसकट सूट दिली तर गर्दी होईल. त्यामुळे लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही," असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.


राज्यातील कोणकोणते जिल्हे रेड झोनमध्ये?
राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नुकतीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची  बैठक बोलावली होती. बुलढाणा (Buldhana), कोल्हापूर(kolhapur), रत्नागिरी(Ratnagiri), सांगली(sangli), यवतमाळ(yavatmal), अमरावती(amravati), सिंधुदुर्ग(Sindhudurga), सोलापूर(Solapur), अकोला(Akola),सातारा (Satara), वाशीम (Washim), बीड (Beed), गडचिरोली(Gadchiroli), अहमदनगर (Ahemdnagar), उस्मानाबाद (Osmanabad) या पंधरा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असून देखील रुग्णसंख्या कमी होत नसल्याची माहिती आहे.