वर्धा : शेतकऱ्याच्या शेतापासून थेट ग्राहकाच्या ताटापर्यंत...वर्ध्यातल्या कारंजामध्ये हसन शफिक आणि सारा शफिक यांनी बीवाय अॅग्रो इन्फ्रा हा प्रकल्प सुरु केला आहे. अन्नाचा कण ग्राहकांपर्यंत पोहचवून शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला देणारा हा प्रकल्प भन्नाट आहे.
शेतकऱ्याकडून योग्य दरात नाशवंत माल घेणे... तो शीतगृहात साठवणे... त्यावर प्रक्रिया करणे... त्याचे कटिंग करणे... आणि पॅकिंग करुन परदेशात पाठवणे. 2013 मध्ये सुरु झालेल्या प्रकल्पात सुरुवातीला पैशापासून क्वालिटीपर्यंत अनेक आव्हानं आली. पण त्यावर मात करत या दाम्पत्याने हा प्रकल्प सुरु ठेवला आणि आता त्याचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे.
बटाटा, कांदा, भोपळा, कच्चा पपई, बीट, कारले, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, लसूण, गाजर अशा अनेक भाज्या इथं साठवल्या जातात. या प्रक्रिया उद्योगाची प्रक्रियाही भन्नाट आहे. त्याचं वर्षभराचं नियोजन असतं आणि प्रत्येक डिपार्टमेन्ट आपापल्या टाईमटेबलप्रमाणे काम करत असतं.
400 ग्रॅम ते 900 ग्रॅम आणि 10 किलो, अशा वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्यांमध्ये हा माल पॅक होतो. समुद्रमार्गे हा माल आखाती देशांमध्ये पोहोचतो आणि तिथले वितरक हाच माल मॉल्समध्येपाठवतात. 10 रुपयांचा माल 50 रुपयांना विकला जातो.
बाजार समित्यांमध्ये कवडीमोल भावानं जाणारं, कधी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकणारं पीक आता बिनधोकपणे कमाई करून देत असल्यानं परिसरातले शेतकरीही निश्चिंत आहेत.
यंदा 10 हजार टन मालाची निर्यात, 18 कोटींची उलाढाल झाली, किमान 300 शेतकऱ्यांच्या मालाला दाम आणि प्रकल्पातल्या 200 कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला. आतापर्यंत मर्यादित देशांमध्ये होत असलेला व्यापार आता अमेरिका आणि जपानला माल पाठवून विस्तारला जाणार आहे.
एका दाम्पत्याच्या धाडसी पावलानं हा प्रक्रिया उद्योग फळाला आला आहे. गरज आहे अशाच धाडसी प्रयत्नांची. म्हणजे पावलोपावली नाडल्या जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दाम मिळेल आणि कर्जमाफीसाठी सरकारकडे हात पसरावे लागणार नाहीत.