वर्धा : आजच्या वैज्ञानिक युगात घुबडाविषयी समाजात अनेक अंधश्रद्धा, गैरसमज पाहायला मिळतात. हे जरी खरं असलं तरिही विविध कारणांनी घुबडं दुर्मिळ होत आहे. अशातच घुबडाची पिल्लं जर एखाद्याच्या मांडीवर खेळताना पाहायला मिळाली तर, विश्वास बसणार नाही ना? पण, हे खर आहे. चला पाहूयात मागील पंधरा वर्षांपासून घुबडांच्या संवर्धनासाठी सुरू असलेली धडपड करणाऱ्या अवलियाबाबत...


वर्धा येथील समुद्रपूर तालुक्याच्या जोगिनगुंफा येथे राहणारा हा शेतकरी. यांचं नाव आहे चक्रधर भगत. नैसर्गिक आपत्तीमुळं होणार्‍या हानीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी शेतात गोठा बांधला आहे. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी शेतात बांधलेल्या गोठ्यात घुबडानं पिलांना जन्म दिला. सुरूवातीला माणसांचा वावर पाहून घुबड उडून जायचं. पण नंतर त्यांनी घुबडाला अपाय होऊ नये, त्याला त्रास होऊ नये याकरीता विशेष खबरदारी घेण्यास सुरूवात केली. घुबड अंडी देणार्‍या खोलीत कुणी जावू नये, श्वान तसेच इतर प्राण्यांपासून त्याच्या अंड्यांना धोका निर्माण होऊ नये म्हणून ते स्वतः सुरक्षिततेची काळजी घेतात.

गेल्या पंधरा वर्षांपासून भगत मागील पंधरा वर्षांपासून घुबडाला प्रजननासाठी सुरक्षित ठिकाण निर्माण करून देतात. पक्षांचा वावर सुरू होताच भगत पूर्वतयारी करायला घेतात. घराच्या मोकळ्या खिडक्या किंवा माळ्यावर कडबा पसरवून ठेवतात. त्यानंतर त्यांच्या शेतातील घरामध्ये घुबड मादी येऊन अंडी देते. येथेच तिच्या पिल्लांचा जन्म होतो. अंडी दिल्यानंतर जवळपास दोन ते अडीच महिने पिल्लांना उडायला येईपर्यंत हे घुबड येथे मुक्कामी असतं. वर्षातून दोन वेळा घुबड मादी अंडी घालत असून त्यांचा कालावधी निश्चित नसतो. पण, साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या कालावधीत घुबड मादा अंडीत देतात. पिलं मोठी झाली की नैसर्गिक अधिवासात रवाना होतात. एरवी सात पिल्ले देणाऱ्या मादी घुबडानं यंदा नऊ अंडी दिली आहेत.

एकीकडे अनेक पक्षी दुर्मिळ होत आहे. त्यातही घुबडासारखे पक्षी तर अंधश्रद्धा, गैरसमजाचे बळी पडतात. अशा स्थितीत चक्रधर भगत यांनी घुबडांना प्रजननासाठी अधिवास उपलब्ध करून संवर्धनासाठी चालविलेली धडपड वाखाणण्या जोगीच आहे. भगत यांच्याप्रमाणे इतरांनीही पक्ष्यांना सुरक्षित अधिवास दिल्यास पक्षांचं संगोपन होईल, यात शंका नाही.