सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद न दिल्याने युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने पक्षाध्यक्ष सोनिया व राहुल गांधींना रक्ताने पत्र लिहुन न्याय देण्याची मागणी केली आहे. या पद्धतीने आता युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आपल्या रक्ताने पक्षाध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षासाठी आयुष्य वाहिलेले सुशिलकुमार शिंदे यांनाही राज्यसभा निवडणुकीत डावलले होते. आता आमदार प्रणिती शिंदे यांनाही मंत्रीपद न दिल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज असल्याचे नागणे म्हणाले.


सोलापूर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद न दिल्याने कार्यकर्ते नाराज झालेत. त्यामुळे नाराज युवक काँग्रेसचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार आहेत. प्रदेश काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे प्रणिती शिंदे यांना डावलल्याचा आरोप एनएसयुआयचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी केलाय. कालच सोमवारी शिंदे यांना मंत्रीपद न मिळाल्याच्या नाराजीतून नगरसेविका फिरदोस पटेल यांनी पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिला. याच पार्श्वभूमीवर आता युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी रक्ताने पत्र लिहले असून अन्य कार्यकर्तेही असेच करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या मंत्रीपदावरून सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळतंय.

मी नाराज नाही -
मंत्रिपद न मिळाल्यानं कुठलीही नाराजी नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी 'माझा'कडे दूरध्वनीवर दिलीय. तसंच कार्यकर्त्यांना राजीनामे न देण्याचं आवाहनही त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून केलं आहे. हे सरकार तीन पक्षाचे मिळून स्थापन झालेलं आहे. त्यामुळे सर्वांनाच न्याय देता येणार नाही. मी नाराज असल्याच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. यापुढेही मी काँग्रेमध्येच राहणार असून पक्ष देतील ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मित्रपक्षही नाराज -
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी झाला. यात 26 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यात मित्रपक्षाला स्थान न दिल्याने मित्रपक्ष नाराज झाले आहे. त्यामुळेच ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मित्रपक्षांचे नेते गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले. परिणामी आगीमी काळाती ठाकरे सरकारसमोर विरोधकांसोबत नाराज नेत्यांचेही आव्हान असणार आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसमुळे खातेवाटप लांबणीवर; दिग्गजांना कमी महत्वाची खाती मिळाल्यानं नाराजी?

Sanjay Raut | शपथ विधी सोहळ्याला संजय राऊत यांची दांडी, भावाला मंत्रिपद मिळालं नसल्यानं राऊत नाराज | ABP Majha