वर्धा : वर्ध्याच्या मांडवा इथल्या रँचोन शेतीत उपयोगात येणार, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सुलभ यंत्र तयार केलं. पण या यंत्राच्या ब्लेडनंच त्याचा घात केला. यंत्राच ब्लेड तुटून शरीरात घुसल्यानं प्रयोगशील रँचोचा मृत्यू झाला. अभिजित प्रशांतराव वंजारी असं या मृत युवकाचं नाव आहे. केवळ 20 वर्षाच्या या युवकाची शेतीत नवीन प्रयोग, नव-नवीन यंत्र तयार करण्यासाठी सातत्यानं धडपड असायची.
अभिजित वंजारी हा पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी. शाळा, महाविद्यालय बंद असल्यानं अनेक मुलं मोबाईलच्या गुंताळ्यात असतात. पण अभिजित वडिलांना शेतीत हातभार लावायचा. तो सातत्यानं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानं बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे पंपाचा उपयोग करून कापणी यंत्र तयार केलं. तुरीचे शेंडे कापण्यासाठी तो याचा उपयोग करत होता. तुरीचे शेंडे कापत असताना अचानक यंत्राच ब्लेड तुटलं आणि अभिजीतच्या शरीरात खुपसलं. त्यात अभिजीतचा मृत्यू झाला..
अभिजितच्या मृत्यूच्या या बातमीनं गाव परिसराला धक्काच बसला. अभिजीतने आदल्या रात्री पावर प्लांट इंजिनिअरिंगकरिता अर्जही भरला होता. त्याला इंजिनिअर बनायचं होतं. पण काळानं त्यापूर्वीच त्याची इंजिनिअर हिरावून घेतली
अभिजितची सातत्यानं नवीन काहीतरी करण्याची त्याची धडपड असायची. अभिजितने शेतातील साहित्य आणण्यासाठी दुचाकीवर ट्राली तयार केली होती. घराजवळ परसबागेत त्यानं मोडक्या साहित्यातून सिंचनाची सोय केली होती. त्याच्याकडे भविष्यातला उद्योजक म्हणूनही बघितलं जात होतं. पण त्याची सगळी स्वप्नं ही स्वप्नंच राहिली.
अभिजीतचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टरच पात तुटून यवतमाळ जिल्ह्यातील प्रयोगशील युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळं युवकांच्या प्रयोगाला चालना देताना त्याचा परिणाम आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याची गरज प्रकर्षान पुढं येतेय.
महत्वाच्या बातम्या :
- स्वप्नांचा 'अपघात' फुलसावंगी येथील ध्येय वेड्या तरुणाचा अपघाती मृत्यू, हेलिकॉप्टर बनवण्याचे स्वप्न राहिले अधुरेच
- बाळूमामांच्या नावावर काही मंडळी पैसे गोळा करत असल्याने निषेधाचा ठराव, भक्तांमध्ये बेबनाव, काय आहे प्रकरण
- झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली बँकांचे तब्बल 40 हजार कोटींचे कर्ज विकासकांनी थकवलं