Wardha Car Accident : मध्यरात्री वर्ध्यात झालेल्या अपघातानं अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. वर्धा (Wardha) येथील दत्ता मेघे वैद्यकिय महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तिरोडा गोरगाव येथील (MLA Son Accident) भाजप आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी त्यांच्या परीक्षा झाल्यानंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला. अचानक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. अपघात एवढी भीषण होता की, सातही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. 


वर्धा येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या ज्या सात विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यापैकी आविष्कार राहांगडाले हा विद्यार्थी मुळचा महाराष्ट्रातील तिरोडाचा आहे. तर इतर सहा विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरील आहेत.  नीरज चौहान, गोरखपूर (उत्तर प्रदेश) नितेश सिंह, जुनाबागा (ओडीसा), विवेक नंदन, गया (बिहार) प्रत्यूष सिंह, गोरखपूर (उत्तर प्रदेश) शुभम जयस्वाल, दिनदयाल उपाध्याय नगर (उत्तर प्रदेश) आणि पवन शक्ती, गया (बिहार) मधील होते. 


वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे सर्व सात विद्यार्थी काल आविष्कारचा हॉस्टेलमधील रूममेट पवन शक्ती या एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यवतमाळला गेले होते. परत येताना त्यांच्या गाडीला हा भीषण अपघात झाल्याची माहिती महाविद्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी दिली आहे.


पाहा व्हिडीओ : सात होतकरू विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू, वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं जीवघेणं



अपघातात मृत्यू झालेल्या सात विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहत होते. तर नितेश सिंह हा विद्यार्थी वर्ध्यात खाजगी रूम करून राहत होता. ज्या महिंद्रा एक्सयुव्ही कारचा अपघात झाला आहे, ती नितेश सिंहच्या मालकीची होती. 


काल रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हॉस्टेलमध्ये राहणारे सहा विद्यार्थी परत न आल्यामुळं दहाच्या सुमारास हॉस्टेलच्या वॉर्डनने याची माहिती महाविद्यालय प्रशासनाला आणि नंतर या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिली होती. काही पालकांनी आमचे पाल्य आम्हाला सूचना देऊन मित्राच्या वाढदिवसासाठी बाहेर गेले आहेत, असें महाविद्यालय प्रशासनाला कळविलं होतं, अशी माहितीही अभ्युदय मेघे यांनी दिली आहे. 


सर्व सातही विद्यार्थ्यांच्या पोस्टमार्टमची प्रक्रिया वर्धाच्या शासकीय रुग्णालयात सुरू झाली असून तिरोडा येथे राहणाऱ्या आविष्कार राहांगडालेचे पार्थिव घेण्यासाठी काही लोक वर्ध्यात दाखल झाले आहे. इतर विद्यार्थ्यांचे पार्थिव परराज्यातून त्यांचे पालक पोहोचल्यानंतर त्यांच्याकडे सुपूर्द केलं जाईल. अशी माहितीही महाविद्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Wardha Accident : वर्ध्यात कारचा भीषण अपघात; 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, भाजप आमदार विजय राहांगडालेंच्या मुलाचाही समावेश