Shivsena MP Sanjay Raut on Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेनं हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर सर्वप्रथम निवडणूक लढवल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, भाजपमधील आजचे नवे नेते, नवहिंदुत्त्ववादी. त्यांच्या इतिहासाची काही पानं कोणीतही फाडून टाकलीत. पण, जर त्यांची इच्छा असेल, तर आम्ही वेळोवेळी त्यांना माहिती देत राहू, असा अप्रत्यक्ष टोलाही संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला आहे. 


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "देशात पहिल्यांदा हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं निवडणूक लढवली. त्यावेळी बाळासाहेबांनी हिंदुत्त्वाचा खुला प्रचार केला होता. तुम्ही पाहू शकता, व्हिडीओ अजूनही युट्यूबवर आहे. बाळासाहेबांनी खुला प्रचार केला होता. विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत, या निवडणुकीत आमच्याविरोधात काँग्रेसही होती आणि भाजपही होती. आमचे रमेश प्रभू लढले होते. त्यानंतर सर्वांना झटका लागला की, बाळासाहेब ठाकरेंनी जो हिंदुत्त्वाचा मुद्दा उचलला आहे. तो जनतेला भावला आहे. आता देशात हिंदुत्व वाढेल आणि या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवू शकतो. त्यानंतर युतीची चर्चा सुरु झाली. भाजपच्या मोठ्या नेत्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली. भाजप नेत्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की, आपण एकत्र निवडणूक लढवूयात. बाळासाहेबांनी या प्रस्तावाला संमती दर्शवली. ते म्हणाले की, आपण सगळे एकत्र निवडणूक लढवूयात. हिंदुत्वाच्या मतांचं विभाजन झालं नाही पाहिजे. त्यावेळी मोठे-मोठे नेते होते. अटलजी, अडवाणी आणि प्रमोदजी होते. त्यावेळी प्रमोद महाजन यांनी मोठी भूमिका निभावली होती."


भाजप, शिवसेना युतीमध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची भूमिका महत्त्वापूर्ण : संजय राऊत 


"भाजप, शिवसेना युतीमध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची भूमिका महत्त्वापूर्ण होती. आजचे जे नवे नेते आहेत भाजपचे, नवहिंदुत्त्ववादी. त्यांच्या इतिहासाची काही पानं कोणीतही फाडून टाकलीत. पण, जर त्यांची इच्छा असेल, तर आम्ही वेळोवेळी त्यांना माहिती देत राहू.", असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. 


मी प्रमोद महाजनांवर व्यक्तीगत टिप्पणी केलेली नाही : संजय राऊत 


संजय राऊत यांनी आता एक जुने व्यंगचित्र ट्वीट करुन भाजपला चिमटा काढला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय नेते प्रमोद महाजन यांचे हे व्यंगचित्र बरंच गाजलं होतं. याचीच आठवण संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला करुन दिली होती. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ते व्यंगचित्र मी काढलेलं नाही. ते आर. के. लक्ष्मण यांनी टाईम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केलं होतं. त्यावेळी शिवसेनेचं महत्त्व काय होतं, हे त्यातून कळतंय."


"मी प्रमोद महाजनांवर व्यक्तीगत टिप्पणी केलेली नाही. प्रमोद महाजन हे त्यावेळी भाजपचे नेते होते. बाळासाहेबांचं प्रमोद महाजनांवर प्रेम होतं. आम्ही सगळेच त्यांच्याशी जोडले गेलो होतो. त्यांची मुलगी पुनम महाजन भाजप खासदार आहे. सध्या कुठे आहे मला माहीत नाही. पण तुम्ही पाहिलं असेल, भाजपनं प्रमोद महाजनांचं कुटुंब असेल, गोपीनाथ मुंडे यांचं कुटुंब असेल, तसेच मनोहर पर्रिकर यांचं कुटुंब असेल, सर्वांना अंधारात ढकललं आहे. त्यामुळे मला पुनम महाजन यांना विचारायचं आहे की, भाजपमध्ये तुम्ही कुठे आहात?", असं संजय राऊत म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Wardha Accident : वर्ध्यात कारचा भीषण अपघात; 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, भाजप आमदार विजय राहांगडालेंच्या मुलाचाही समावेश



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha