पंढरपूर : लाखो वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिराचे गेल्या दोन वर्षांपासून फायर ऑडिटच केले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वर्षाकाठी सव्वा ते दीड कोटी भाविकांची ये-जा असणाऱ्या या वास्तूमध्ये वातानुकूलित यंत्रणा, अस्ताव्यस्त वायरिंग यामुळे मंदिराला आगीचा धोका संभवू शकतो. यामध्ये देवाचे किचन देखील मंदिरात असल्याने दरवर्षी मंदिराचे फायर ऑडिट करून त्रुटी दूर करणे अत्यंत महत्त्वाचे असायला हवे होते. मात्र 2018 नंतर मंदिराने फायर ऑडिट करून न घेतल्याने आता मुख्यमंत्र्यांकडे असणाऱ्या विधी व न्याय विभागालाचं यात लक्ष घालावे लागणार आहे.


शॉर्ट सर्किट किंवा वातानुकूलित यंत्रणेमुळे आगीच्या दुर्घटना सातत्याने घडत असतात. यातच विठ्ठल मंदिरात सध्या असलेले वायरिंग अतिशय धोकादायक पद्धतीचे असून लाकडी विठ्ठल सभामंडपाच्याकडेनेच हे वायरिंग नेण्यात आलेले आहे. याच्या शेजारून दर्शनाची रांग मंदिराच्या छतावरून जात असते. याशिवाय मंदिराला लागून असलेला सात मजली दर्शन मंडप अतिशय चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला आहे. याला आपत्कालीन वेळेस बाहेर पडायचा मार्गचं नसल्याने आता मंदिर प्रशासन 7 मजल्यापैकी केवळ एकाच मजल्याचा वापर करीत आहे.


विठ्ठल मंदिराचा DPR पुरातत्व विभागाच्या सल्ल्याने बनवून घेण्याचे काम सुरु असून काही दिवसापूर्वी इन्फ्रा रेड कॅमेराने मंदिराच्या वस्तूची तपासणीही करण्यात आलेली आहे. विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू अकराव्या शतकातील असून अशी पुरातन आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तीर्थक्षेत्राबाबत गांभीर्याने काळजी घेणे गरजेचे असताना मंदिराने गेल्या दोन वर्षांपासून फायर ऑडिट न करणे हा खूप गंभीर प्रकार आहे.


याबाबत मंदिराकडून मात्र सध्या कोरोना असल्याने कमी भाविक मंदिरात येतात. त्यामुळे फायर ऑडिट राहिल्याचे कारण पुढे करीत येत्या मार्च किंवा एप्रिल मध्ये हे करून घेतले जाईल असे सांगितले आहे. याबाबत विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या भावना तीव्र असून भाविकांच्या जीवाशी खेळ न करता तातडीने फायर ऑडिट करून घेण्याची मागणी भाविकांतून पुढे येत आहे.


विठ्ठल मंदिर ज्या विधी व न्याय विभागाच्या ताब्यात आहे त्याचा कारभार खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच असून ते स्वतः विठ्ठल भक्त असल्याने लाखो भाविकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी फायर ऑडिटसारखे विषय तरी गांभीर्याने हाताळण्याचे आदेश मंदिर समितीला देतील.


संबंधित बातम्या :





Bhandara Fire Tragedy | भंडाऱ्यातील दुर्घटनेवेळी रुग्णालय कर्मचारी झोपेत होते? 10 चिमुकल्यांचा मारेकरी कोण?