बुलढाणा : भंडारा येथे रात्री सामान्य रुग्णालयात 10 लहान बालके आग लागल्याने दगावली आहेत. या घटनेने राज्यातील सर्व सामान्य रुग्नालयाचे फायर ऑडिटचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेच्या धर्तीवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्नालयाचे 2016 पासून फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने देशातील सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात यावे अश्या सूचना केल्या होत्या. मात्र, कुठेही फायर ऑडिट झाले नसल्याचे चित्र आहे.
राज्यात सातत्याने अनेक सामान्य रुग्णालयात आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार दरवर्षी फायर ऑडिट करुण घेणे आवश्यक आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही कक्षात फायर सिलेंडर लावल्याचे दिसून आले. तर अतिदक्षता विभागात कुठेही फायर सिलेंडर लावलेले दिसून आले नाही. माहिती घेतली असता अतिदक्षता विभागात फायर सिलेंडर नाही असे सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांना फायर सिलेंडर कसं वापरायचं याचंही प्रशिक्षण नाही
नवजात शिशु अतिदक्षता विभागात फायर सिलेंडर लावलेले दिसून आले, या जिल्हा सामान्य रुगनालयाचे फायर ऑडिट झाल्या नसल्याचे समोर आले आहे. या संबंधी आज स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना विचारणा केली असता त्यानी फायर ऑडिट झाले नसल्याचं सांगितलं. जर आग लागली तर धोका कायम असल्याचे चित्र स्पष्ट आहे तसेच जर आग लागली तर रुग्णालयातील कुठल्याही कर्मचाऱ्यांना फायर सिलेंडर कसे वापरायचे याचे प्रशिक्षण दिले नसल्याची माहिती सुद्धा आहे. फायर ऑडिट विषयी कॅमेरा समोर बोलायला प्रशासनाने नकार दिला आहे.
भंडाऱ्यात नेमकं काय झालं?
महाराष्ट्राच्या काळजाचं पाणी करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समजतं. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचं समोर आलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं.
Bhandara Fire | भंडाऱ्यात घडलेली घटना दुर्दैवी : अजित पवार