मुंबई: विरारच्या अर्नाळा गावात सध्या भटक्या कुत्र्यांची दहशत बघायला मिळत आहे. गेल्या 24 तासात गावातील 10 मुलांना कुत्र्याने चावा घेतला आहे. अर्नाळा गावात कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतीच उपाययोजना केली नाही. सध्या गावातील महिला मुलांना हातात काठी घेवून फिरावं लागतं आहे. 


समुद्राच्या जवळच असलेल्या विरार येथील अर्नाळा गावात सध्या हेच चित्र दिसून येत आहेत. येथील गावातील महिला आणि लहान मुलांच्या  हातात काठी दिसत आहेत. ही काठी कुणाला मारण्यासाठी नव्हे तर कुत्र्यांपासून स्वतःच संरक्षण करण्यासाठी हातात घेवून या महिला-मुलं फिरत असतात. सध्या अर्नाळा गावात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. 1 फेब्रुवारीला अर्नाळा गावातील नालेकर पाडा येथील राहणार आठ वर्षाचा आयुष कुशवाह या चिमुरड्याच्या समुद्रकिनारी चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी कानाचे मांस ओरबडून खाल्लं होतं. आयुषच्या शरीरावर आठ ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतला होता. रोडवर वडापाव विकून आपला उदर्निवाह करणाऱ्या या कुशवाह कुटुंबाला अचानक 25 हजाराच भुर्दंड सहन करावा लागला.  मात्र तेथे क्रिकेट खेळणारी मुलं होती, ती धावत आल्यामुळे आयुषच जीवन तरी  वाचलं. 


अर्नाळा गावात गेल्या 24 तासात 10 मुलांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तसेच या आधीही लहान मुलांना येथील भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. गावातील 9 वर्षाचा मुलगा दिप दांडेकर यालाही बुधवारी कुत्र्यांना चावा घेतला आणि गंभीर दुखापत केली. तर पंधरा दिवस अगोदर कृती प्रल्हाद तरे या सात वर्षीय मुलीच्या हाताचा लचकाच तोडला. त्याच बरोबर 24 डिसेंबर रोजी रॉयल थॉमस कोळी या 9 वर्षाच्या मुलालाही पाच ते सहा कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केलं होतं. त्यामुळे या गावातील नागरिक भटक्या कुत्र्यांमुळे दहशतीखाली वावरत आहेत. 


अर्नाळा गाव हे समुद्रकिनारी असल्याने त्या ठिकाणच्या सर्व कुटुंबाचं उदरर्निवाह मासेमारी आणि मासेविक्री वर होते. मासे विक्रीसाठी महिला घराबाहेर पडतात. तर मासेमारीसाठी ही पुरुष वर्ग बोटीवर असतो. अशावेळी गावात एकट्याने खेळणाऱ्या लहानग्यांना ही कुत्री शिकार बनवत आहेत. त्यात आता ही भटकी कुत्री मोठ्या महिला, पुरुषांच्या अंगावरही चावा घेण्यासाठी सरसावत आहेत. एकाचा तर समुद्रात मासेमारी करताना, समुद्राच्या पाण्यातच चावा घेतला होता. 


अर्नाळा ग्रामपंचायतीने या चार वर्षात महानगरपालिकेकडे कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात मागणी केली. मात्र अर्नाळा ही ग्रामपंचायत असल्याने त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात मागणी केली पाहिजे होती ती अजूनपर्यंत केलीच नाही. त्यामुळे ग्रामपंचायत एवढ्या मोठ्या समस्येकडे गांभीर्याने घेत नसल्याच दिसून आलं आहे. आता आपण कुञ्याच्या नसबंदीसंदर्भात प्रशासनाकडे मागणी करणार असल्याच उपसरंपचांनी सांगितलं आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha