नवी मुंबई : नवी मुंबईतील दिघा झोपडपट्टीत राहणाऱ्या 10 मुलांनी सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. त्यांनी टाकलेल्या 'रिल्स' ला इस्टाग्राम वर लाखोंचे हिट्स मिळत  आहेत. लाईक्सचा पाऊस पडत आहे. गात नाहीत, वाजवत नाहीत.. नाचतही नाहीत....तरीही यांना लाखो लाईक्स मिळत आहे. 


नवी मुंबईतील दिघा झोपडपट्टीत येणाऱ्या आंबेडकर नगर मधील ही अवघ्या 14 ते 16 वयातील  मुले... लॉकडाऊन लागल्याने करायचे काय असा प्रश्न पोरांना पडला. बाहेर जाणे बंद... शाळा कॉलेज बंद... खेळ बंद.. मग वेळ कसा घालवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला. लॉकडाऊनला कंटाळलेल्या पोरांना भन्नाट कल्पना सुचली.  न गाणारी, न वाजवणारी, न नाचणारी वाट लावे बॅन्जो पार्टी.. या बॅन्जो पार्टीने सोशल मीडियावर टाकलेल्या 'रिल्स' ला लाखोंचे हिट्स मिळत असल्याचे 'वाट लावे बॅन्जो पार्टीचा सदस्य मजूर जोशी यांने सांगितले.




 केंद्र सरकारने टिक टॉक बंद केल्यानंतर पोरांनी इन्स्टाग्रामकडे आपला मोर्चा वळवला. इनस्टाग्रामवर टाकण्यासाठी 30 सेकंदाच्या छोट्या  'रिल्स' ही मुले बनवतात. टीम एम एच - 43 या नावने त्यांचे सोशल मिडीयावर आकाऊंट असून 'वाट लावे ब्न् पार्टी'  हा त्यांचा ब्रॅंन्ड आहे. झोपडपट्टीतील पडक्या घराला पोरांनी स्टुडिओ केलाय. याचं ठिकाणी भंगारात पडलेले पत्र्यांचे डबे, तेलाचे कॅन, जुनाट सिलेंडर, मडकी यांचे वाद्य म्हणून वापर केला जातो. मराठी , हिंदी गाण्यांवर फक्त 30 सेकंदाचे रिल्स बनवताना कोणताही मुलगा गात नाही, वाजवत नाही, नाचत नाही. फक्त हे सर्व करण्याची ॲक्टिंग करतात.


 सोशल मीडियावर सध्या या टीमने धुमाकूळ घातलाय. लाखोंच्या घरात लाइक्स,कमेंट्स, views मिळू लागले आहेत. कोरोना काळात मुलांनी केलेल्या गाण्यांवरील कॉमेडी रिल्स बघून पेशंटचे दुखने पळून गेले आहे. लाखोंच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झाले आहे. महाराष्ट्रमधून आम्हाला फोन येत असून लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचे  राहूल पेठारी म्हणाला.


 झोपडपट्टीत राहणारी या टीम मधील मुलं कोणी शाळेत तर कोणी महाविद्यालयामध्ये आहेत. दुपारपर्यंत ॲानलाईन क्लास झाले की संध्याकाळी 4 वाजता रिल्स बनविण्यासाठी पडक्या घरात जमतात. कोणी थीम ठरवतो... कोणी ॲक्टिंग.. तर कोणी सोशल मिडीया हॅंडलिंग.. या पद्धतीने सर्वांनी कामे वाटून घेतली आहेत.  यांना मिळणारा प्रतिसाद पाहता जाहिरातीचा ओघ या टीमकडे वळू लागला आहे  यातून चार पैसे मिळाल्यास याचा पुढील  शिक्षणासाठी  वापर करणार असल्याचे ह र्षद सरदारने स्पष्ट केले .