हिंगोली : राज्यात मराठा समाजाचं आरक्षण सुरु असताना एक फोटो व्हायरल होत आहे. प्रचंड संताप आणणारा हा फोटो... आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आपल्या पोलीस बांधवाच्या पाठीत लाथ घातल्याचा हा फोटो... अवघ्या देशात वायरल झाला आणि अनेक जणांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.


मराठा आंदोलनात घुसलेल्या काही समाजकंटकांनी हे कृत्य केल्याचा दावा केला जाऊ लागला. पण कालांतराने हा फोटो मराठा आंदोलनातला नसल्याचाही दावा करणाऱ्या पोस्ट वायरल झाल्या.

पण या फोटोचं सत्य काय? खरंच हा मराठा आंदोलनादरम्यानचा आहे...? की कुणी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी खोडसाळपणा केला आहे? याचाच शोध आम्ही घेतला.

हा फोटो हिंगोलीतल्या डोंगरकड्याचा असल्याची प्राथमिक माहिती आमच्या रिपोर्टरला कळली. आम्ही तात्काळ डोंकरकड्यात दाखल झालो आणि समोर आलं... या फोटोमागचं सत्य...

तारीख 24 जुलै... नांदेड-नागपूर महामार्गावर असलेल्या डोंगरकडामध्ये मराठा आंदोलन सुरु होतं... शेकडो आंदोलकांनी महामार्ग रोखला होता... बाळापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्ताला होते. त्याचवेळी काही आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

बंदोबस्ताला असलेले सतीश मोडक हे मध्यस्थीसाठी गेले. तेव्हाच एका अज्ञाताने त्यांच्या पाठीत लाथ घातल्याचा दावा त्यांनी केला.

सतीश यांनी संयम दाखवत आंदोलकांना रस्त्यावरून हटवलं. पण त्याचवेळी त्यांच्या एका सहकाऱ्याने पाठीत बुटाचा शिक्का उमटलेला फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढला... फोटो संध्याकाळी पोलिसांच्या ग्रुपवर पोस्ट केला आणि तिथून तो अवघ्या महाराष्ट्रात वायरल झाला.

त्यामुळे एबीपी माझाच्या पडताळणीमध्ये वायरल झालेला हा फोटो खरा ठरला आहे.

व्हिडीओ :