पोलादपूर बस दुर्घटना: रायगड: पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात खासगी बस 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. धक्कादायक म्हणजे जो कर्मचारी वाचला, त्याने खोल दरीतून वर येत, मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला  फोन करुन झालेल्या अपघाताची माहिती दिली. प्रकाश सावंत-देसाई असं या अपघातातून बचावलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. प्रकाश सावंत देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक आहेत.

या अपघातातून आणखी एक कर्मचारी बचावला. नुकतंच लग्न झालेल्या प्रविण रणदिवे यांनी ऐनवेळी पिकनिकला जाणं टाळलं. त्यांना पत्नीने न जाण्याची विनंती केल्याने, त्यांनी ही पिकनिक टाळली.

पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया 

प्रविण रणदिवे हे सुद्धा कोकण कृषीविद्यापीठाचे कर्मचारी आहेत. ते सुद्धा या पिकनिकला जाणार होते. मात्र नुकतंच लग्न झालेल्या प्रविण यांना त्यांच्या बायकोने न जाण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी तब्येत बरी नसल्याचं कारण देत पिकनिकला जाणं टाळलं होतं.

प्रविण रणदिवे यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला असता ते म्हणाले, “टीव्हीवरुनच दुपारी 12.30 वाजता अपघाताची माहिती मिळाली. या वृत्ताने अतिशय दु:ख झालं. मी आज सकाळी साडेसहा वाजता सहकाऱ्यांना कॉल केला, तेव्हा तब्येत बरी नसल्याने आपण पिकनिकला येत नसल्याचं सांगितलं.  सहकाऱ्यांनी पिकनिकचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. नऊ वाजेपर्यंत चॅटिंग सुरु होतं, पण त्यानंतर कॉन्टॅक्ट झाला नाही”



पोलादपूरजवळ बस दरीत कोसळली

कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात एक खासगी बस 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. धक्कादायक म्हणजे जो कर्मचारी वाचला, त्याने खोल दरीतून वर येत, मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला  फोन करुन झालेल्या अपघाताची माहिती दिली. प्रकाश सावंत-देसाई असं या अपघातातून बचावलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. प्रकाश सावंत देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक आहेत.

महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली. खोल दरीत बस कोसळल्याने बसचा चेंदामेंदा झाला आहे. इतकंच नाही तर मृतदेहांची अवस्था छिन्नविछिन्न झाली.

अपघाताची माहिती कशी मिळाली?

या अपघातातून एक कर्मचारी आश्चर्यकारकरित्या बचावला. त्या कर्मचाऱ्याने घाटातून वर येऊन या अपघाताची माहिती कोकण कृषी विद्यापीठाला कळवली, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक संजय भावे यांनी दिली.

आमची बस दरीत कोसळली, अशी माहिती देसाई नावाच्या कर्मचाऱ्याने विद्यापीठात फोन करुन सांगितलं, असं संजय भावे यांनी एबीपी माझाला सांगितलं.

रेंज आली आणि अपघातातून वाचल्याचा थरार कळवला

या अपघातातून एक कर्मचारी आश्चर्यकारकरित्या बचावला. हा कर्मचारी कसाबसा 800 फूट दरीतून आला. वर आल्यानंतर रस्त्यावर त्याच्या मोबाईलला रेंज आली, त्यानंतर त्याने सर्वात आधी या अपघाताची माहिती कोकण कृषी विद्यापीठाला कळवली. आमची बस दरीत कोसळली, आम्हाला मदत करा, अशी माहिती प्रकाश सावंत-देसाई या कर्माचाऱ्याने दिली.

या अपघाताची माहिती त्या कर्मचाऱ्याने दिली नसती, तर हा अपघात झालाय हे समजण्यास अनेक तास-दिवस लागले असते. कारण अपघात झाला, ते ठिकाण अवघड वळणाचं किंवा अपघातग्रस्त ठिकाण नव्हतं.

वाचलेल्या कर्मचाऱ्याने अपघाताची माहिती मिळाल्यानंतर, दापोली कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने त्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्वात आधी महाबळेश्वर पोलीस आणि पोलादपूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांना नेमका अपघात कुठे झाला, हेच कळत नव्हतं. बस नेमकी कुठून खाली कोसळली आणि ती बस दरीत कुठे आहे, हेच शोधण्यात पोलिसांचा वेळ गेला. अखेर पोलिसांना बस कोसळलेलं ठिकाण आणि ठिपक्याएवढी बस दिसली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं.



संबंधित बातम्या 

पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, 32 जणांचा मृत्यू  

प्रकाश देसाई दरीतून वर आले, रेंज आल्यावर अपघाताची माहिती दिली!  

पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया