बीड : बीड जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड प्रवीण राख यांचा काल वाढदिवस होता. वकील साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या मित्र मंडळींनी कोर्टाच्या आवारात कार्यक्रम घेतला. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता बीड शहरामध्ये लॉकडाऊन असताना वकील मंडळींनी एकत्रित येत कोर्ट परिसरातच वाढदिवस साजरा केला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबतचे नियम अक्षरश: पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळालं. याप्रकरणी आता अकरा वकिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण राख यांचा वाढदिवस साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही. एवढंच काय तर उपस्थितांनी तोंडाला मास्क देखील बांधले नव्हते. हे सेलिब्रेशन एक तासापेक्षा अधिक काळ चालले. याठिकाणी मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम देखील झाला. विशेष म्हणजे यावेळी काढण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर पण टाकण्यात आले.
बीड शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. म्हणून एकीकडे लॉकडाऊन खुले होत असताना बीड शहरातमध्ये मात्र मागच्या आठवडाभरापासून पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी एकीकडे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना कायद्याची सगळ्यात जास्त माहिती या मंडळींना आहे. किंबहुना ज्यांच्यावर जबाबदारी पण आहे अशा मंडळींनी मात्र न्यायालयाच्या आवारात एकत्रित येत वाढदिवस साजरा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
वाढदिवस साजरा तर केलाच पण सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याने हा सगळा प्रकार समोर आला. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी फेरोज पठाण यांच्या फिर्यादीवरून अॅड प्रवीण राख, अॅड अविनाश गंडले, अॅड भीमराव चव्हाण, प्रभाकर आंधळे, उद्धव रासकर, श्रीकांत साबळे, गोवर्धन पायाळ, विकास बडे, श्रीकांत जाधव, विनायक जाधव, रोहिदास येवले या सर्व वकील मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Bharat Biotech कडून कोरोना लसीवर संशोधन सुरु: नागपूरच्या गिल्लूरकर रुग्णालयात ट्रायल