कोल्हापूर : अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यात चार जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केली. करवीर, पन्हाळा-शाहूवाडी, हातकणंगले आणि चंदगड या चार मतदारसंघांवर जनसुराज्य पक्षाने दावा केला. तर करवीरमधून सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे यांना आमदार करा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. कोल्हापूरमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विनय कोरे बोलत होते.
पन्हाळा परिसरात जनसुराज्यचा पराभव देशातला नाही तर परदेशातला कोणताही पक्ष करू शकत नाही असं सांगत विनय कोरे म्हणाले की, महायुतीच्या सात खासदारांमधील एक खासदार तुम्हाला जनसुराज्य शक्ती पक्षाने दिला आहे हे लक्षात ठेवा. महायुतीमध्ये आम्हाला सन्मानाने जागा द्या. कोल्हापूर जिल्ह्यातील चार जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला मिळाल्याच पाहिजेत. करवीर विधानसभा मतदारसंघाचा येणारा आमदार जनसुराज्य शक्ती पक्षाचा असेल. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापूरमधील एकूण 15 जागा आम्हाला मिळाव्यात.
आर आर आबांना गृहमंत्री केलं
आमदार विनय कोरे म्हणाले की, 2004 विधानसभा निवडणुकीमध्ये आमचे चार आमदार आले होते. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने माझ्याकडे पाठिंबा मागितला होता. त्यावेळी जोतिबाला मानणाऱ्या सामान्य कुटुंबातील आर आर पाटील यांना उपमुख्यमंत्री करणार असाल तर माझ्या पक्षाचा तुम्हाला पाठिंबा असेल असं मी सांगितलं होतं.
संताजी घोरपडे यांना आमदार करा
विनय कोरे म्हणाले की, कोल्हापूरमध्ये स्थापन झालेल्या आपल्या पक्षानं सामान्य कुटुंबातील तरुणाला उपमुख्यमंत्री केलं. गेल्या काही वर्षांत पक्षाने अनेक चढ उतार पाहिले. मात्र विचार कधी सोडला नाही. करवीरमधून आमदार होणाऱ्या व्यक्तीने जिल्ह्यात या मतदारसंघाचं नाव घेतलं जावं असं काम कधी केल का? त्यामुळे आता करवीर विधानसभा मतदारसंघातून संताजी घोरपडे (Santaji Ghorpade) यांना आपण समोर आणायचं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुती मध्ये आम्ही 15 जागांची मागणी केली आहे. कोल्हापूरच्या चार जागांसोबतच सांगली, सोलापूर आणि अन्य जिल्ह्यातील जागा लढावण्याची तयारी आम्ही केली आहे अशी माहिती विनय कोरे यांनी दिली.
आम्ही जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपचा घटकपक्ष आहोत. महाविकस आघाडी वेळी आम्हाला सोबत येण्याचा प्रस्ताव दिला गेला होता. मात्र तरीही भाजपची साथ सोडली नाही. आम्हाला तरी भाजपकडून वेगळी वागणूक मिळाली नाही. इतर छोट्या घटक पक्षाचं मला माहीत नाही. करवीर विधानसभा बाबत आम्हाला प्रश्न येणार नाही. जिथं विद्यमान आमदार आहेत त्याच जागा त्या त्या पक्षांना मिळणार आहेत. जनसुराज्य शक्ती पक्ष 2004 पेक्षा वेगाने मोठा झालेला या निवडणुकीत दिसेल.
जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये कार्यकर्त्याचा फक्त वापर कधी झाला आहे का? असा सवाल आमदार विनय कोरे यांनी विचारला. ते म्हणाले की, 2009 ला धामणी धरणासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन प्रयत्न केले आणि परवानगी आणली. पण 2009 पासून आतापर्यंत धामणी धरण पूर्ण होऊ शकलं नाही. याला कोण जबाबदार आहे? गेल्या 15 वर्षांत आपण ज्यांना आमदार केलं त्यांनी आपल्यासाठी काय केलं याचा विचार करा.
सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या साथीला
विनय कोरे यांनी माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रदीप नरके यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे अस सांगत आता कोणी तरी येईल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर एका वर्षाने ते त्यांच्यासोबत गेला. मात्र महविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी जो संघर्ष केला त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जनसुराज्य पक्ष आघाडीवर होता.
ही बातमी वाचा :