अकोला : अकोला जिल्ह्यातील सोनूना गावच्या पोलीस पाटलांच्या एका आरोपाने सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. आपल्या कुटुंबियांवर गावकऱ्यांनी जवळपास महिनाभरापासून सामाजिक बहिष्कार घातल्याचा आरोप पोलीस पाटील रमेश कदम यांनी केला आहे. गावकऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. पोलीस पाटलांच्या तक्रारीवरुन चान्नी पोलिसांनी 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.


अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातलं सोनूना गाव सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. पाचशे लोकसंख्येचं हे गाव पूर्णत: आदिवासी आहे. रमेश कदम हे सोनूना गावाचे पोलीस पाटील आहेत. त्यांच्या कुटुंबियांवर गेल्या महिनाभरापासून गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप कदम यांना केला आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या शेताला लागून मंदिर कम सामाजिक सभागृह बांधलंय. मात्र, हे बांधकाम आपल्या मालकीच्या जागेत असल्याचं सांगत कदम यांनी बांधकामाला विरोध केला आहे. यावरुनच गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांवर गेल्या महिनाभरापासून सामाजिक बहिष्कार टाकला आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना किराणा, दळण, पाणी देणे बंद केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


कदम कुटुंबियांशी बोलणाऱ्यांना दंडाची तरतूद करण्यात आल्याचं कदम यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. सोनूना गाववासियांनी मात्र सामाजिक बहिष्काराचा हा आरोप फेटाळला आहे. तर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.


यासंदर्भात पोलीस रमेश कदम यांनी गावातील 12 जणाविरुद्ध चान्नी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. यावरुन त्यांच्याविरोधात चान्नी पोलिसांनी सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.


जातपंचायत, सामाजिक बहिष्कार या गोष्टी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला लागलेला डाग आहे. या प्रथेचं समूळ उच्चाटन झालं तर छत्रपती शिवाजी महाराज अन् फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राची प्रतिमा उजळून निघेल.