मुंबई :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपल्या स्पष्टवक्तेपणामुळं प्रसिद्ध होते. त्यांच्या हजरजबाबीपणा देखील अनेकवेळा अनुभवायला मिळायचा. त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुखनं देखील त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची काही उदाहरणं सांगितली आहेत. रितेशनं सांगितलं की, ज्यावेळी मला चित्रपटाची ऑफर मिळाली होती, त्यावेळी मी बाबांना (विलासराव देशमुख) ही गोष्ट सांगण्यासाठी आलो. त्यावेळी मला त्यांनी सांगितलेलं एक वाक्य आजही लक्षात आहे. ते मला म्हणाले की, तू तुझ्या नावाची काळजी घे मी माझ्या नावाची काळजी घेईल.  त्यांचं हे वाक्य मला नेहमी प्रेरणा देतं. तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे त्याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी, असं रितेशनं कट्ट्यावर सांगितलंय.


जिनिलियासोबत भांडणं झाल्यानंतर रितेशची भन्नाट ट्रिक, माझा कट्ट्यावर सांगितलं गुपित 


बॉलिवूडमधील लाडका अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री लिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza)ही जोडी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दोघांमधील प्रेम त्यानंतर लग्न आणि आतापर्यंतचा प्रवास जबरदस्त आहे. आपल्या दिलखुलास बोलण्यानं दोघेही चाहत्यांची मनं जिंकत असतात. ही फेव्हरेट जोडी दिवाळी पाडव्यानिमित्त एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात आली आहे. यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत. आज सायंकाळी चार वाजता हा कट्टा प्रसारित होणार आहे. 


यावेळी रितेश म्हणाला की, आपल्याला चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी डन असं सांगितलं. मग मीच त्यांना म्हणालो जरा थांबा, मला घरी याबाबत बोलावं लागेल. मला जाणीव होती की आपले वडील मुख्यमंत्री आहेत. आपण असंच निर्णय घेऊ शकत नाही. आईला सांगितल्यावर त्यांनी होकार दिला. मग मी बाबांना भेटायला गेलो. वर्षा बंगल्यावर त्यांना भेटलो आणि चित्रपट करणार असल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले तू अॅक्टिंग करणार आहेस का? मी हो असं सांगितलं. त्यानंतर मी त्यांना म्हटलं की, सिनेमा चालला नाही तर लोकं विलासरावांच्या मुलाचा सिनेमा चालला नाही असं म्हणत तुमच्यावर टीका होईल. माझी काही ओळख नाही, तुमची ओळख आहे. त्यावर ते (विलासराव देशमुख) की, तू तुझ्या नावाची काळजी घे मी माझ्या नावाची काळजी घेईल. त्यांचं हे वाक्य मला नेहमी प्रेरणा देतं. तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे. त्याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी, असं रितेशनं सांगितलं. त्यानंतर ही फिल्म फायनल झाली, असं रितेशनं सांगितलंय.  


दिवाळीच्या सणाबद्दल विचारलं असता रितेशनं सांगितलं, लग्नानंतरची पहिली दिवाळी आम्ही लातूरलाच साजरी केली. आम्ही दहा वर्षात बहुतांशवेळा लातूरमध्येच दिवाळी साजरी केली. बाबा (विलासराव देशमुख) मंत्री झाल्यानंतर आम्ही मुंबईत आलो. ते मंत्री असताना देखील आम्ही बाभळगावातच दिवाळी साजरी करायचो. लहानपणीची दिवाळी भन्नाट असायची. आपल्याकडे प्रत्येक 100 किलोमीटरला परंपरा बदलतात. मुंबईतील दिवाळी आणि गावाकडची दिवाळी यात खूप फरक आहे, असं रितेशनं सांगितलं. आम्ही सगळे घरी बसून एकत्र दिवाळी साजरी करतो. आपल्याकडे प्रत्येक सणाच्या मागे एक कहाणी आहे, त्या गोष्टी एन्जॉय करायला हव्यात, असं रितेश म्हणाला.