मुंबई : चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण हेच तिवरे धरणाचे ठेकेदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते  विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.


धरण फुटल्यामुळे झालेले मृत्यू सरकारच्या अनास्थेचे बळी आहेत. या सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी त्यांनी केली. सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. हे आमदार आणि संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

तसेच नैतिक जबाबदारी घेऊन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राजीनामा द्यावा, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान धरणाची डागडुजी व्यवस्थित न झाल्यामुळे धरण फुटल्याचा दावा आमदार सदानंद चव्हाण यांनी केला आहे.

दुसरीकडे,  दुर्घटनेतील जीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून या घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याची घटना काल रात्री घडली. त्यात एक वाडी वाहून जाऊन काही लोक बेपत्ता झाले आहेत, तसेच काही मृतदेह हाती लागले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून सुरु असलेल्या मदतकार्याची त्यांनी माहिती घेतली. या दुर्घटनेची चौकशी करुन पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

चिपळूणमधील तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केली होती, अशी कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. तसंच धरण फुटीप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत असंही महाजन यांनी सांगितलं.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं. या घटनेत सहा जणांचे मृतदेह सापडले असून 19 जण बेपत्ता आहेत. अलोरे-शिरगाव पोलिस चौकीच्या हद्दीत मंगळवारी (02 जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. भेंडेवाडी, तिवरे, आकले, कादवड, नांदिवसे, दादर, गानेखडपोली या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

याविषयी गिरीश महाजन म्हणाले की, "ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. दापोली लघुपाटबंधारे विभागाचं हे छोट धरण होतं. आतापर्यंत सहा मृतदेह हाती लागले आहेत. गावकऱ्यांनी धरण फुटल्याची, गळत असल्याची तक्रार केली होती. जलसंपदा खात्यांतर्गत हे धरण येत असल्याने दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनीही दुरुस्ती केली असं उत्तर दिलं होतं. परंतु आता या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत."



दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती
तिवरे धरण हे दापोली लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतं. 2000 साली या धरणांचं बांधकाम पूर्ण झालं. 20 लाख क्युबिक मीटर पाणीसाठी मावेल एवढी या धरणाची क्षमता आहे. परंतु मागील काही वर्षात या धरणाची दुरुस्ती झालेली नाही. अनेक गावांना या धरणाच्या पाण्याचा पिण्यासह शेतीसाठी उपयोग होतो. दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती लागली होती, पण गेल्या वर्षी गळतीत वाढ झाली.

बेपत्ता लोकांची नावं

अनंत हरिभाऊ चव्हाण (वय 63 वर्ष)
अनिता अनंत चव्हाण (वय 58 वर्ष)
रणजित अनंत चव्हाण (वय 15 वर्ष)
ऋतुजा अनंत चव्हाण (वय 25 वर्ष)
दुर्वा रणजित चव्हाण (वय 1.5 वर्ष)
आत्माराम धोंडू चव्हाण (वय 75 वर्ष)
लक्ष्मी आत्माराम चव्हाण (वय 72 वर्ष)
नंदाराम महादेव चव्हाण (वय 65 वर्ष)
पांडुरंग धोंडू चव्हाण (वय 50 वर्ष)
रवींद्र तुकाराम चव्हाण (वय 50 वर्ष)
रेश्मा रविंद्र चव्हाण (वय 45 वर्ष)
दशरथ रविंद्र चव्हाण (वय 20 वर्ष)
वैष्णवी रविंद्र चव्हाण (वय 18 वर्ष)
अनुसिया सीताराम चव्हाण (वय 70 वर्ष)
चंद्रभागा कृष्णा चव्हाण (वय 75 वर्ष)
बळीराम कृष्णा चव्हाण (वय 55 वर्ष)
शारदा बळीराम चव्हाण (वय 48 वर्ष)
संदेश विश्वास धाडवे (वय 18 वर्ष)
सुशील विश्वास धाडवे (वय 48 वर्ष)
रणजित काजवे (वय 30 वर्ष)
राकेश घाणेकर (वय 30 वर्ष)