जालना : एकीकडे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं असतानाच तिकडे जालना जिल्ह्यातल्या धामणा धरणाच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. भिंतीमधून पाणी पाझरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या तड्यांमुळे धरणाच्या आजूबाजूच्या तीन ते चार गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

धामणा धरण हे भोकरदन तालुक्यातील सेलूदमध्ये आहे. या धरणात सध्या 90 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षात प्रथमच धरणात एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र धरणाच्या भिंतील तडे गेले असून पाणी पाझरत असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सेलूद, पारध, खुर्द पारध, बुद्रुक या चार गावांना धोका होऊ शकतो.

मागील दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले तुडुंब वाहू लागले असून, रायघोळ नदीला पूर आला होता. तर जुई, धामणा धरणात पाण्याची आवाक होऊ लागली आहे. मात्र पाणी वाढल्याचा आनंद असताना, दुसरीकडे धरणाच्या भिंतीला तडा गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

धामना धरण 1972 साली बांधण्यात आले होते. 10.72 दशलक्ष घनमीटर एवढी क्षमता असलेलं हे धरण आहे. यापैकी 9.2 दशलक्ष घनमीटर एवढा यात पाणीसाठा आहे. जवळपास 1 हजार 788 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येतं. या धरणावर 20 गावांची तहान भागते. 2013 नंतर हे धरण पहिल्यांदा एवढ्या क्षमतेने भरले आहे.

Tiware Dam Breached | तिवरे धरणाला तडे गेल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती : महाजन