Vidhan Parishad Election Maharashtra 2022 : अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये असलेले कट्टर राजकीय वैर संपूर्ण राज्याला माहीत आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले तर आपण एकनाथ खडसे यांना मतदान करणार असं, वक्तव्य चंद्रकांत पाटील (Eknath Khadse) यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात राजकीय वैरी असल्याचे बोलले जाते. परंतु, वरिष्ठ नेत्यांचे आदेश आले तर एकनाथ खडसे यांना मतदान करणार असल्याची भूमिका पाटील यांनी घेतली आहे.
"महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. मी अपक्ष आमदार असलो तरी शिवसेनेच्या विचाराने वाढलो आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्याप्रमाणे मी मतदान करेन, यात एकनाथ खडसे असो की इतर कुणी असो," अशी भूमिका आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, " एकनाथ खडसे आणि माझ्यात राजकीय तसेच व्यक्तिगत मतभेद आहेत. शिवाय अपक्ष आमदार असलो तरी मी शिवसेनेच्या विचारांनी वाढलो आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्यानुसार एकनाथ खडसे असो किंवा इतर कोणी असो, आणप त्याच उमेदवाराला मतदान करू.
आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे हे एकमेकांचे पक्के राजकीय वैरी समजले जातात. दोघांकडून नेहमीच एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. असे असताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेमुळे चर्चांना उधाण आले आहे.
आगामी विधान परिषदेसाठी कोणाला मतदान करणार याबाबत बोलताना आमदार पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "मी अपक्ष आमदार आहे, परंतु, शिवसेनेच्या विचाराने वाढलो आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्यांच्या आदेशाप्रमाणे आणि महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते तसेच शिवसेनेतील वरिष्ठ नेते जो आदेश देतील त्यानुसार मतदान करणार आहे. वरिष्ठांनी एकनाथ खडसे यांना मतदान करण्यास सांगितले तर राजकीय वैर आणि व्यक्तिगत मतभेद विसरून त्यांना मतदान करेन असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केल आहे.