Vidhan Parishad Election : अखेर राष्ट्रवादीच्या वतीने एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची नावे विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर मागील अनेक दिवसांपासून मनात साचलेल्या भावना एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना मोकळ्या केल्या. भाजपने माझ्यावर अन्याय केला परंतु शरद पवारांनी विश्वास दाखवत मला संधी दिली. एकनाथ खडसे राजकारणातून इतिहास जमा झालेत म्हणणाऱ्यांना उत्तर मिळाली, असं एकनाथ खडसे म्हणाले. या निवडणुकीत आपला विजय होईल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
खरंतर राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार 2014 साली स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून एकनाथ खडसे यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र त्यावेळीं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर सरकारमध्ये असतानाच झालेल्या आरोपामुळे एकनाथ खडसे यांना महसूल आणि कृषी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर कायम ईडीचं शुक्लकाष्ठ त्यांच्या मागे लागलं.
एकनाथ खडसे यांना पुढे 2019 साली विधानसभेची तिकीट देखील नाकारण्यात आलं आणि त्यावेळी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांचा देखील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. हे एकीकडे सुरु असताना दुसरीकडे ईडीच्या नोटीसा येणे सुरुच होतं आणि त्यामुळेच खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार यासाठी संधी देण्यात आली, मात्र जवळपास दीड वर्ष उलटून देखील अद्याप त्याबाबत निर्णय झाला नाही. परंतु दरम्यानच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खडसे यांनी 21 पैकी 11 जागा राष्ट्रवादीच्या निवडून आणून बँक आपल्या ताब्यात घेतली आणि खान्देशात पक्षाची ताकद वाढवण्यासाठीची मुहूर्तमेढ रोवली.
त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुका आणि विधानभवनात भाजप विरोधातील एक महत्त्वाचा आवाज म्हणून एकनाथ खडसे यांना संधी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच विधानभवनात एकनाथ खडसे यांची विरोधकांवर तोफ धडाडताना पाहिला मिळणार आहे.