Monsoon News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. दरम्यान, यंदा मान्सून लवकर येणाचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र, मान्सूनच्या आगमनासाठी थोडा उशीर झाल्याचे दिसत आहे. 


कोकणात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यानं ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण, राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची वाट बघत आहेत. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर पुढच्या 4 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे. तळकोकणात पुढच्या  48 तासात मान्सून दाखल होणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी काही ठिकाणी उष्णतेची लाट असल्याची स्थिती देखील आहे. पुढील चार दिवसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.






राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी


सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हिंगोली, अमरावती, सातारा नाशिकसह कोकणातील काही भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही भागातही पावसानं हजेरी लावली, नवी मुंबईतही सकाळापासून या पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. हिंगोलीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालं आहे. शेकडो एकरवरील केळीच्या बागांचं नुकसान झालं आहे. काल झालेल्या वादळी वाऱ्यात सर्व केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तर नाशिकच्या मनमाडमध्येही जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं घरांवरील पत्रे उडाले आहेत. अमरावतीच्या धामणगाव इथे टोल प्लाझाचं छप्पर उडालं आहे. उत्तर रत्नागिरीत मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. काल संध्याकाळी चिपळूण, खेड, दापोलीत पावसानं दमदार हजेरी लावली. 


महत्वाच्या बातम्या: