लातूर : विधानपरिषद निवडणुकीपूर्वी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अकरा वर्षांपासून मुंडे गटाचे खंदे समर्थक असलेले रमेश कराड उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशामुळे त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार आहे.


उस्मानाबाद-लातूर-बीडचे विद्यमान विधानपरिषदेचे आमदार दिलीपराव देशमुख यांचा कार्यकाळ संपत आहे. तीन टर्म दिलीपराव देशमुख यांनी ही जागा अबाधित ठेवली होती. मात्र नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी यावेळी जागा सोडली.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या राजकारणाला शह देण्यासाठी मोठी खेळी खेळत कराड यांना संधी दिली. रमेश कराड हे पंकजा मुंडेंचे मानलेले भाऊ आहेत.

कोण आहेत रमेश कराड?

रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.

लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली आहे.

विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.

या आमदारांचा कार्यकाळ संपणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक)

राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली)

काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड)

भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती)

भाजपचे मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली)