Vidarbha Weather Update : गेल्या कित्येक दिवसांपासून वाढलेले तापमान आणि उकड्यामुळे पुरते हैराण झालेल्या वैदर्भीयांना आता दमदार पावसाची आतुरता लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सूननं (Monsoon) राज्यातील अनेक भागात मजल मारली असल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र अद्याप विदर्भात (Vidarbha) दमदार पावसाची प्रतिक्षाच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, उष्णतेचा पारा सरासरीपेक्षा वरच असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. राज्यात बहुतांश भागात पावसाने दमदार एंट्री केली असली तरी विदर्भात अद्याप पावसाने दांडी दिल्याने नेमका पाऊस गेला तरी कुठे? असा प्रश्न या निमित्याने विदर्भवासियांना पडला आहे.
तर दुसरीकडे शेतीतीत पेरणीसाठी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. अशातच नागपूरसह (Nagpur) उर्वरित विदर्भात काल, सोमवारी पावसाने एंट्री केली. नागपूरात अवघ्या काही तासात कोसळलेल्या 18 मिमी पावसाने नागपूरकर सुखावले आहेत. मात्र, पूर्व मोसमी पावसानेच सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली, मोठे होर्डिंगही कोसळले, तर अनेक ठिकाणी वीजपडून अनेक जनावरे देखील दगावली आहेत.
पावसात चार जण जखमी तर पाच जनावरांचा मृत्यू
प्रादेशिक हवामान विभागाने (Monsoon Arrived in Vidarbha) वर्तविलेल अंदाजानुसार नागपूरसह विदर्भात मान्सून पूर्व पावसाने दमदार एंट्री केलीय. तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भाला यलो अलर्ट जारी केला आहे. अशातच भंडारा जिल्ह्यातही बहुप्रतिक्षेनंतर पावसानं काल सायंकाळी जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसात वीज अंगावर कोसळल्यानं वेगवेगळ्या घटनेत चार जण गंभीर जखमी झालेत. तर, पाच पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
दमदार पावसाच्या हजेरीनंतर कपाशीच्या लागवडीला वेग
कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात मागील आठवड्यात दोन -तीनदा कोसळलेल्या दमदार पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी राजा कापसाच्या टोबणीच्या कामाला लागला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 30 हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीन्या उरकल्या आहे. त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कापसाचे आहे. ज्या ठिकाणी हा पाऊस बरसला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेरणीच्या कामाला वेग आलाय. पाऊस पुढे बरसेलच या आशेने शेतकऱ्यांनी लागवड पेरणी केली आहे. हवामान खात्याने पुन्हां आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने येत्या 15 दिवसात 100 टक्के लागवड पुर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात दरवर्षी साडे आठ ते 9 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात येते.
बकऱ्यांचा कळपावर वीज पडून 22 बकऱ्यांचा जागीच मृत्यू
यवतमाळच्या (Yavatmal) उमरखेड तालुक्यातील चुरमुरा शेत शिवारातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार आज जिल्ह्यात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, एका शेतकऱ्याने शेतात झाडाच्या खाली उभ्या केलेल्या बकऱ्यांच्या काळापावर अचानक वीज पडून यात 22 बकऱ्यांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सकाळपासूनच अनेक भागात ढगाळी वातावरण होते. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. अशातच जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील चुरमुरा शेत शिवारात वीज कोसळून या बकऱ्यांचा क्षणातच मृत्यू झाला आहे. या मृत झालेल्या बकऱ्या गावातीलच 17 नागरिकांच्या असून यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
वर्ध्यात पावसाने मारली दांडी, पेरण्या लांबल्याने शेतकरी चिंतेत
अर्धा जून महिना निघून गेला तरी वर्धा जिल्ह्यात मृग नक्षत्रात पाऊस बरसला नाही. शेतकरी मृग नक्षत्रात पावसाची प्रतीक्षा करतो आणि लगबगीने पेरणी देखील उरकवीत असतो. पण दहा दिवस लोटले असतानाही पाहिजे तसा पाऊस झाला नाही. तर काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आहे. तर काहींच्या पेरण्या पावसाअभावी थांबल्या आहे. परिणामी, शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. पेरण्या लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी खरीप हंगामात चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा ठेऊन असणारा शेतकरी वर्धा जिल्ह्यात पावसाची अद्याप प्रतीक्षाच करतो आहे.
इतर महत्वाच्या बातम्या