Vidarbha Weather Update Buldhana : हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार विदर्भात (Vidarbha) दमदार मान्सून पूर्व पावसासह वादळी वाऱ्याने एकच दाणादाण उडवली आहे. काल 11 जूनच्या संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वारा आणि पावसाने विदर्भातील बहुतांश भागात मोठे नुकसान केल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे घडली आहे. काल सायंकाळी चिखली, सिंदखेडराजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. यावेळी अनेक घरांवरील छत उडून गेली. तर अनेक मोठी झाडेही उन्मळून पडली.


दरम्यान चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे एक दुर्दैवी घटना घडलीय. सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने अनेक घरावरील छत उडालीत. यावेळी एका घरात छताला बांधलेल्या झोक्यात सहा महिन्यांची चिमुरडी झोपली होती. दरम्यान या वादळाने अँगलसह छत आणि चिमुकलीच्या झोकाही उडवून नेलाय. यात या सहा महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


घराच्या छतासह अँगललला बांधलेला झोपाळा उडाला


बुलढाणा जिल्ह्यात काल सलग कोसळलेल्या  मान्सून पूर्व पावसासह वादळी वाऱ्याने  जिल्ह्याला अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. यात अनेक ठिकाणी मोठ्या नुकसानीच्या घटना समोर येऊ लागल्या आहे. मात्र अशीच एक हृदय हेलावून टाकणारी घटना देऊळगाव घुबे या गावात घडली आहे. या गावातील रहिवासी असलेले भरत मधुकर साखरे यांच्या घराचे छत वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: उडवून नेले. यावेळी घराच्या छताला एका लोखंडी अँगललला झोका बांधलेला होता आणि त्यात एक सहा महिन्याची चिमुकली झोपलेले होती.


दरम्यान सोसाट्याच्या वादळाने अँगलसह छत आणि चिमुकलीच्या झोक्यासकट उडून गेल. साधारणतः 200 फूट अंतरावर ती पत्रे जमिनीवर आदळली. या घटनेत चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सई असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून ती आवघ्या 6 महिन्यांची होती. देऊळगाव घुबे येथील भरत मधुकर साखरे यांची ती मुलगी होती. या घटनेने साखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे. 


विदर्भात सलग कोसळत असलेल्या पावसाने वैदर्भीयांना दिलासा 


दुसरीकडे सलग तिसऱ्या दिवशीही बुलढाण्यात मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, नांदुरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. काही वेळ कोसळलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे सलग पडत असलेल्या पावसाने शेतकरीही सुखावलाय. त्यामुळे आगामी दोन दिवसात खरिपाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी दोन दिवसाचा अवधी उरला असला तरी वाशिम जिल्ह्यातही आज सलग पाचव्या दिवशी अनेक भागात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजाच्या शेतातील कामांना आणि पेरणीना वेग येणार असल्याचे चित्र निर्माण झाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या