Vidarbha Unseasonal Rain : हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात (Vidarbha) पुन्हा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी आज दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. तर या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय.


अशातच आज विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटास 30-40 प्रतितास सोसाट्याचा वाऱ्याने झोपडपून काढले आहे. तसेच अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांचा घरावरील पत्रे उडून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तसेच पुढील तीन दिवस हीच परिस्थिथी कायम राहणार असल्याचा अंदाजही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.  


विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचं थैमान 


एकीकडे राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने नवे उच्चांक गाठले असताना, दुसरीकडे मात्र पुन्हा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने, ऐन उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा अनुभवायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. तर कुठे अनेकांना यात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने संकटाचे ढग आणखी गडत होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 


झाडं उन्मळून पडली,शेतमालचेही प्रचंड नुकसान


यवतमाळच्या वणी तालुक्याला आज दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. जवळपास ऐक तास जोरदार आलेल्या पावसाने रस्ते चिखलमय झाले. तर उकनी परिसरात वाऱ्याच्या वेगाने मोठ-मोठे झाड उन्मळून खाली पडले आहेत. काही ठिकाणीचे रस्ते ही बंद पडल्याने वाहतूक विस्कळित झाल्याचे चित्र आहे. शिवाय शेतात असलेलं आंबा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.


गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस


गेल्या पाच दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळाले. अशातच आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र वादळी वारा आल्यामुळे कापणीला आलेल्या धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आज दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे व गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने शेतपिकांचे आणि गावातील घराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर कुठे मोठमोठी झाडे पडली असून घरावरील टिन-पत्रे उडाली. तसेच विजेची तारे तुटल्याने बराच वेळ वीज पुरवठाही खंडित झाला आहे.


चंद्रपुरातील जनजीवन विस्कळीत


चंद्रपूर जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने चंद्रपुरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले. गेल्या आठवडाभर वाढत्या तापमानाने चंद्रपूरकर त्रस्त झाले होते. मात्र, आज दुपारी अचानक ढगांची दाटी होत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. कालांतराने अचानक सर्वत्र अंधारल्याने महामार्गावरील वाहनांना देखील हेडलाईट लावून मार्गक्रमण करावे लागले आहे. तरदुसरीकडे मात्र वाढत्या तापमानापासून नागरिकांना मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या