संगमनेर : तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच संगमनेरमध्ये निधन झालं. त्या 82 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, रघुवीर खेडकर यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य पॉझिटिव्ह होते. त्यातील काही जणांना काल (सोमवारी 24 मे) घरी सोडण्यात आले.


सन 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे.




कांताबाई सातारकर यांचा थोडक्यात परिचय


देशातल्या प्रत्येक राज्याला काही लोककला लाभल्या आहेत. या प्रत्येक लोककलेला कमीअधिक प्रमाणात लोकाश्रय मिळाला आहे. महाराष्ट्र मात्र याबाबतीत इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक समृद्ध आहे. इथे कितीतरी लोककला बहरल्या आहेत. यापैकी सर्वाधिक लोकप्रियता मिळालेला लोककलाप्रकार म्हणजे तमाशा. मराठी लोकरंगभूमीवर ज्या ज्या कलाकारांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडली आहे त्यातील खूप वरचे नाव म्हणजे कांताबाई सातारकर.


गुजरातमधील बडोदा जिल्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी जन्मलेया कांताबाईना तमाशाचा तसा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आईवडील सातारा या मूळगावी आले. इथे कांताबाई कोणत्याही गुरुविना छोट्या मित्र मैत्रिणींसमोर नृत्य सादर करता करता त्यांना नवझंकार मेळ्यात नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरु झाला. छोट्यामोठ्या तमाशात काम करीत त्या खूप मोठी स्वप्ने घेऊन मुंबईला जाऊन पोहोचल्या. मुंबईत तमाशामहर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात एक कलाकार म्हणून करता करता त्यांच्यातील अस्सल कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. असंख्य धार्मिक, पौराणिक, सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थिएटरला जाऊ लागला.


1964 मध्ये अचानक तुकाराम खेडकरांचे निधन झाले. आणि शब्दशः वनवास म्हणता येईल अशी अवस्था कांताबाईंच्या आयुष्यात आली. पण तमाशाच्या बोर्डावर शिवाजी संभाजी या पुरुषी भूमिका रंगवणाऱ्या कांताबाई खऱ्या आयुष्यातही तशाच धाडशी होत्या. कधीकाळी पतीच्या म्हणजे स्वतःच्याच तमाशा फडात काम केलेल्या कांताबाईंना दुसऱ्याच्या फडत काम करणे रुचत नव्हते. त्यांनी जिद्दीने पै-पै जमवून स्वतःचा तमाशा फड उभा केला. एका स्त्रीने परंपरेने वाट्याला आलेला सुतळीचा तोडाही न घेता स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला आणि पुढे अमाप लोकप्रियता मिळून आजही तेव्हढ्याच दिमाखात उभा असलेला एकमेव तमाशा फड हा कांताबाईंचाच.


एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित,अभिजित,नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. त्यांच्या जीवनावर डॉ संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आजवर चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्य सृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमान त्यांना मिळाला आहे. असंख्य पुरस्कार, असंख्य मानसन्मान मिळवलेल्या या महान कलावतीला मात्र रसिकांचे प्रेम हाच आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान वाटतो.