कोल्हापूर : ज्येष्ठ सुगम संगीत गायिका रजनी करकरे यांचं कोल्हापुरात निधन झालं आहे. 74 वर्षांच्या रजनीताईंना फुफ्फुसांचा आजार होता. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचारही सुरु होते. मात्र काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रजनी करकरे यांना श्वसनसंस्थेच्या त्रासासोबतच फिट्सचाही त्रास सुरु होता. रजनीताई नसीमा हुजरुक यांच्या हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड संस्थेच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होत्या. त्यांनी स्वत:च्या अपंगत्वावर मात करत मराठी सुगम संगीताच्या क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. आकाशवाणीवरुनही गेली जवळपास 30 वर्षं त्या सुगम संगीताचे कार्य़क्रम करत होत्या.
रजनीताईंचा ‘आनंदाचे डोही’ हा लोकप्रिय कार्यक्रम होता. ज्याचे एक हजाराहून जास्त प्रयोग झाले आहेत. त्या गेली 16 वर्षं सुगम संगीताचे मार्गदर्शन वर्गही घेत होत्या. कोल्हापूरमधील शर्वरी जाधव, सारेगमप फेम प्रसेनजीत कोसंबी, आणि अभिजीत कोसंबी यांनीही रजनीताईंकडून गाणं शिकलं होतं.
रजनीताईंचं कार्य :
‘आनंदाचे डोही’ कार्यक्रमाचे 1000 हून जास्त प्रयोग
दैवत, हे दान कुंकवाचे, वरात सिनेमांसाठी पार्श्वगायन
1984 मध्ये नसिमा हुरजुक यांच्याबरोबर ‘हेल्पर्स ऑफ द हॅन्डीकॅप्ड’ या संस्थेची रजनीताईंनी स्थापना केली.
गेली तीस वर्षे या संस्थेच्या उपाध्यक्षपदी कार्यरत
कलांजली संस्थेच्या माध्यमातून सोळा वर्षांहून अधिक काळ सुगम संगीत मार्गदर्शनाचे वर्ग