किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने पाडगावकरांवर उपचार सुरु होते. पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पाडगावकर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून परिचीत होते. त्यांचा काश्मीर प्रश्नाबाबतचा अभ्यासही गाढा होता.
1 मे 1944 रोजी जन्मलेल्या पाडगावकर यांनी 24 व्या वर्षी पत्रकारितेला सुरुवात केली होती.
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली होती. त्याशिवाय त्यांनी दिग्दर्शन आणि पटकथा लेखन पदवीही मिळवली होती. फ्रान्समध्ये त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पॅरिस प्रतिनिधी म्हणून टाईम्स ऑफ इंडियाने त्यांची नियुक्ती केली होती.
पाडगावकरांनी 1978 ते 86 या काळात त्यांनी युनेस्कोमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसेवा अधिकारी म्हणून काम पाहिलं. ते 1988 ते 1994 पर्यंत टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक होते.
फ्रान्सने 2002 मध्ये पाडगावकरांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरवलं होतं.
दिलीप पाडगावकर हे 10 दिवसांपूर्वीच एबीपी माझाच्या माझा विशेष या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 'मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे अतिरेकी कारवायांना आळा बसला का?' या विषयावरील चर्चेत त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली होती.