पालघर : भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या त्रासाला जनता किती वैतागली आहे, याचाच प्रत्यय पालघरमध्ये आला आहे. पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट आणि पालघरचे नायब तहसिलदार सतीश मानिवडे यांना ठाण्याच्या लाच लुचपत विभागानं 50 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. या कारवाईनंतर नागरीकांनी चक्क फटाके फोडून आनंद व्यक्त केला.


फिर्यादीची जमीनविषयक चार प्रकरणे शिवाजी दावभट यांच्यापुढे प्रलंबित होती. त्या प्रकऱणांचा निकाल फिर्यादीच्या बाजूने लावण्यासाठी शिवाजी दावभट यांनी 50 लाख रुपये लाच मागितली होती. लाच देण्यासाठी फिर्यादीने 47 लाखाच्या खेळातील नोटा आणि तीन लाखाच्या खऱ्या नोटा एका बॅगेत ठेवल्या होत्या. तो व्यवहार होत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकानं शिवाजी दावभट यांना ताब्यात घेतलं. यावेळी सोबत असलेले त्यांचे सहकारी नायब तहसिलदार सतीश मानिवडे आणि खाजगी वाहनचालक जयेश पाटील याला ही ताब्यात घेतलं आहे. दावभट यांना अटक करुन त्यांची  चौकशी सुरु करण्यात आली आहे.

दावभट यांनी अवैध मार्गाने मोठया प्रमाणावर माया जमा केली आहे. येथील स्थानिक व्यावसायिकांना त्यांनी आर्थिक फायद्यासाठी नाहक मोठया प्रमाणात त्रास दिला होता. त्यामुळे दावभट यांना पकडल्यानंतर स्थानिकांनी आनंद साजरा करत चक्क फटाके फोडले. लाचलुचपत विभागानं दावभट यांच्या एकूण मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.