मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकावरून सध्या मोठा वाद निर्माण झालाय. ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या खुर्शीदांच्या नव्या पुस्तकातील हिंदुत्वाच्या तुलनेमुळे खुर्शीद वादात सापडलेत. खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आलाय. दिल्लीतील वकील विवेक गर्ग यांनी दिल्ली पोलीस आयुक्तालयात खुर्शीद यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.


सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील संदर्भावर टीका करताना भाजपनं ‘मुस्लिम मतांसाठी भगवा दहशतवादासारख्या कल्पना वापरणाऱ्या पक्षाच्या सदस्यांकडून अजून काय अपेक्षा केली जाऊ शकते?’ असा सवाल उपस्थित केला आहे.


हिंदुत्वाबद्दल नेमकं काय लिहिलंय? 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकाचं प्रकाशन बुधवारी झालं. त्यावरुन आता देशात मोठा वाद सुरु झालाय. या पुस्तकात हिंदूत्वाबद्दल असं लिहिण्यात आलं आहे की, 'ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे.'


खुर्शीद यांच्या 300 पानांच्या पुस्तकांमध्ये हिंदू धर्माविषयी हा उल्लेख आला असल्याने आता हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप आक्रमक झालं आहेत. हिंदुत्वाचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपनं खुर्शीदांविरोधात तक्रार केली आहे. 


उत्तर प्रदेशात होवू घातलेल्या विधानसभा निवडणूका आणि त्यात आधीच जीनांच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं असताना आता  खुर्शीद यांच्या पुस्तकातील संदर्भाची भर पडलीय. या सगळ्यांचा निवडणुकांवर काही परिणाम होईल का? हे पहावं लागेल. 


महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha