Vengurla Dumping Ground : कचरा म्हटलं की लोक नाक दाबून तिथून जातात. मात्र जर कचऱ्याच्या मैदानावर कुणी जेवणाचा आस्वाद घेतला, हळदीकुंकू समारंभ केला, सहल नेहली असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. मात्र सिंधुदुर्गातील वेंगुर्ले नगरपरिषदेचे तात्कालिक मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी वेंगुर्ले शहरातील कचऱ्याचे 27 प्रकारात वर्गीकरण करून स्वच्छ भारत अभियानात जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार वेंगुर्ले नगरपरिषदेला मिळवून तर दिलेच मात्र त्यांनी केलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची दखल केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डने घेतली आहे. सन 2022-23 च्या सहावी विज्ञानच्या अभ्यासक्रमात वेंगुर्ले नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाला स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. अभ्यासक्रम संपूर्ण देशात सीबीएसई बोर्डाला शिकवला जाणार आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेने केलेल्या कामाचं नाव देशपातळीवर चमकणार आहे.


वेंगुर्ले नगरपरिषदेच्या डंपिंग ग्राऊंडला स्वच्छ भारत पर्यटनस्थळ असं नाव देण्यात आलं आहे. मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या कार्यातील हा प्रकल्प त्यानंतरचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रभावी पणे चालवला. रामदास कोकरे यांच्या संकल्पनेतून शून्यकचरा व डंपिंग ग्राउंडमुक्त वेंगुर्ले नगरपरिषदेचा स्वच्छ भारत पर्यटन स्थळ कचरा व्यवस्थापन प्रकल्प देशभरात आदर्श म्हणून गौरवला जात आहे. UNDP नेही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत 27 प्रकारात कचरा वर्गीकरण व संकलन करून त्याचे विघटन केले जाते. घनकचरा व्यवस्थापन अभ्यासाची पंढरी म्हणून वेंगुर्ला नगरपरिषदची दखल राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. 




डम्पिंग ग्राउंडचं स्वच्छ भारत पर्यटन स्थळ नांव देत केलेला कचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा तात्कालिक मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी रोवला आहे.  कोकरे यांच्यानंतर आलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी कचऱ्याचं व्यवस्थापण तसंच ठेवलं आहे. या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाची दखल सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) घेऊन सहावी विज्ञानच्या अभ्यासक्रमात वेंगुर्ले घनकचरा व्यवस्थापनाचा पथदर्शी प्रकल्प म्हणून उल्लेख केला आहे. शहराला आतापर्यंत मिळालेल्या अनेक पुरस्काराबरोबरच या सीबीएसई अभ्यासक्रमात वेंगुर्ले नगरपरिषदचा उल्लेख ही अभिमानाची गोष्ट आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेच्यावतीने शहरात राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाचे धडे आता देशभरातील विद्यार्थी गिरवणार आहेत.


सध्या या घनकचरा व्यवस्थापनाचे कल्याण डोंबिवली नगरपालिकेत देखील अनुकरण होत आहे. वेंगुर्ला, माथेरान नगरपरिषदेने त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून माथेरान मधील डम्पिंग ग्राउंड मुक्त रस्त्याला रामदास कोकरे यांचे नाव दिले आहे. त्यांची ही घनकचरा व्यवस्थापनातील संकल्पना राज्यात व देशात राबविण्यात आलेली आहे. वेंगुर्ल्यातील शून्य कचरा व्यवस्थापन उपक्रम अभ्यासासाठी आजतागायत लाखो लोकांनी भेटी दिल्या असून अनेक शाळा-कॉलेजच्या सहली देखील तिथे येतात.




जगाला कायम भेडसावणारा कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी अनोख्या कचरा वर्गीकरण पद्धतीचा स्वीकार करून कचरामुक्त डंपिंग ग्राउंड ही संकल्पना पुढे आणली. शुन्य कचरा व्यवस्थापन करत उल्लेखनीय काम कोकरे यांनी केले होते. त्यांच्या या कार्याची दखल सीबीएसई बोर्डाने घेतली असुन इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात याबाबत धडा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील विद्यार्थी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे धडे गिरवणार आहेत.  


शालेय अभ्यासक्रमात घनकचरा व्यवस्थापन याबाबत साक्षरता निर्माण झाल्यास नक्कीच चांगला परिणाम होईल. हा विचार करून वेंगुर्ला घनकचरा व्यवस्थापन म्हणजेच कचरा विरहित डंपिंग ग्राउंड हा धडा सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड) बोर्डाने इयत्ता सहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे. एखाद्या अधिकाऱ्याने दूरदृष्टी ठेऊन चांगले काम केल्यास त्याचा अभ्यासक्रमात समावेश करणे म्हणजे त्या अधिकाऱ्याचा त्या शहराचा गौरवच आहे. तसेच चांगले काम इतरांसाठी दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. त्यामुळे नक्कीच मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचे कार्य अभिमान वाटेल असेच आहे.