Ashadhi Ekadashi 2024: पंढरपूर : यंदाची आषाढी वारी (Ashadhi Wari) विक्रमी होणार असल्यानं पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यात्रा कालावधीत ड्रंक अँड ड्राईव्हचा (Drunk and Drive) फटका गोरगरीब वारकऱ्यांना बसू नये, म्हणून प्रत्येक टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितलं आहे. पंढरपूर शहर पोलिसांनी गेल्या काही दिवसांत नामदेव पायरी येथे चोरीला गेलेले भाविकांचे 24 लाख 14 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने शोधून काढले होते. याची पाहणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक आले असता, ते माझाशी बोलत होते. गेल्या काही दिवसात मंदिर परिसरात भाविकांच्या अंगावरील दागिने पळवण्याच्या घटना समोर येत आहेत. शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी 13 जणांना अटक करून त्यांचेकडून 34 तोळे 4 ग्रॅम सोनं हस्तगत केलं आहे. 


यंदा आषाढी वारीच्या तयारी संदर्भात पोलिसांनी विविध उपाययोजना केल्याचं सांगितलं जात आहे. 11 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि 12 जुलै रोजी संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाल्याचं सरदेशपांडे यांनी सांगितलं आहे. यासाठी पालखी जिल्ह्यात आल्यावर कोणती वाहतूक कुठून वळवायची, याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही अवजड वाहतूक पालखी सोहळा किंवा पंढरपूर शहरात येणार नाही, याची काळजी घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. 


सध्या ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रक चालकांनी मद्य प्राशन केल्याचं आढळून येत आहे. त्यांच्यावर तातडीनं कारवाई केली जात आहे. अशा मद्यपी चालकांचा भाविक किंवा दिंड्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व 13 मार्गांवर पोलिसांची तपासणी आणि गस्त सुरू ठेवली आहे, असं त्यांनी सांगितलं. यात्रा काळात पंढरपूर शहरात सर्वात जास्त गर्दी नामदेव पायरी, मंदिर परिसर, महाद्वार घाट, चंद्रभागा नदीपात्र, चंद्रभागा वाळवंट, चौफाळा, दर्शन रांग, गोपाळपूर पत्रा शेड या परिसरात असते. ही सर्व ठिकाणं प्रेशर पॉईंट ठरवण्यात आली असून हाथरस प्रमाणे  दुर्घटना किंवा चेंगराचेंगरी टाळण्यासाठी या सर्व ठिकाणी प्रशिक्षित टीम तैनात करण्यात आल्या आहेत. या टीममधील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजनांचं प्रशिक्षण देखील देण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.  


मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेला धनगर समाज, महर्षी वाल्मिकी संघ आणि सकल मराठा मोर्चानं विरोध दर्शविला आहे. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. यासाठी राज्यभरातील धनगर समाज शेळ्या मेंढ्यांसह पंढरपूरकडे पायी चालत येऊ लागला आहे. याबाबत बोलताना पंढरपूरचं भौगोलिक क्षेत्र अतिशय कमी असून त्याजागी 18 ते 20 लाख भाविक एकत्र येत असताना आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पहिलं काम असणार आहे, असे त्यांनी सांगितलं. आपल्या गावात एवढ्या मोठ्या संख्येनं संत आणि वारकरी येत असतात. मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला विरोध करणाऱ्या संघटनांनी विरोध सोडून वारी सुखरूप होण्यासाठी स्वयंसेवक म्हणून प्रशासनाची मदत करावी, असं आवाहनही पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आंदोलकांना केलं आहे. या सर्व संघटनांशी पोलीस प्रशासन चर्चा करत असून यातून मार्ग निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आषाढी यात्रा काळात कोणत्याही व्हीव्हीआयपी नेत्यांच्या दौऱ्याची माहिती अद्याप प्रशासनाला मिळालेली नसल्याचा खुलासाही शिरीष सरदेशपांडे यांनी केला आहे.