Maharashtra News: रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि प्रदूषण टाळणयासाठी राज्यातील 20 ठिकाणी वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्र सुरू करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. रस्ता सुरक्षा निधीतून आय अँड सी सेंटरसाठी तब्बल 375 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यातील 20 ठिकाणी वाहन निरिक्षण आणि परिक्षण केंद्रांचा (I & C Center) मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्यातील वाहनांची आता कसून तपासणी होणार आहे.
या 20 ठिकाणी होणार वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्रे
अहमदनगर, अकलूज, भंडारा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कराड, मालेगाव, नागपूर (पूर्व), नवी मुंबई, उस्मानाबाद, पेण, सांगली, सिंधूदुर्ग, वसई, वर्धा आणि यवतमाळ या शहरांमध्ये वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्र उभारण्यात येणार आहेत. आरटीओंच्या कार्यालय अंतर्गत या वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.
नेमकं काय आहे वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्र?
दरवर्षी रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या ही मोठी असून गाडी चांगल्या स्थितीत नसल्याने देखील अपघात होत असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांची फिटनेस चाचणी अत्यंत काटेकोरपणे करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता, स्वयंचलित यंत्रणेमार्फत गाड्यांची तपासणी या वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्रांत करणं सोपं होणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने भरीव निधीची तरतूद केली आहे.
या केंद्रांमध्ये नक्की कसली तपासणी होते?
केद्रांमध्ये होणाऱ्या फिटनेस चाचणीमध्ये गाडीचे ब्रेक, इंजिन, टायर, लाइट, आदींची संपूर्ण तपासणी होते. त्यासाठी टेस्ट ट्रॅकवर गाडी चालवून पाहिली जाते आणि ती व्यवस्थित असल्यास आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येतं. चाचणीच्या वेळी गाडीमध्ये जर काही दोष आढळला, तर वाहनचालकाला गाडीची पुन्हा फिटनेस चाचणी करावी लागते.
नागपूर शहर वाहतूक विभागासाठीही भरीव निधी
नागपूर शहर वाहतूक पोलिसांसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागपूर शहर वाहतूक विभागासाठी रस्ते वाहतूक निधीतून ही भरीव तरतूद करण्यात आली आहे. नागपूर शहरात रोड बॅरिकेड्स लावणे, लोखंडी किंवा स्टील बॅरिकेड्स लावणे, सोलार पोर्टेबल ट्रॅफिक सिग्नल बसवणे, पोलिसांसाठी विशेष कारची सुविधा उपलब्ध करुन देणे, आदी कामांसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.
हेही वाचा: