मुंबई: मोठ्या शहरात गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती आहे. भाजी खरेदीसाठी मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या गर्दीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाऊन असूनही लोक शहरात अजूनही भाजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये जातात. प्रशासनाने वारंवार सांगूनही गर्दी कमी होत नसल्याने याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे सरकार मोठ्या शहरात भाजी मार्केट बंद करण्याच्या विचारात आहे.


वाशी एपीएमसीमधील कांदा बटाटा मार्केट सोमवारपासून बंद

वाशी एपीएमसीमधील कांदा बटाटा मार्केट सोमवार पासून बंद होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मुंबई, उपनगरात माल पोहोचविल्यानंतर सोमवार पासून लाॅकडाऊन जोपर्यंत राहिल तोपर्यंत मार्केट बंद राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

धारावीतील 10 रस्त्यावरील भाजीपाला मार्केट, फेरीवाले बंद

धारावीतील 10 रस्त्यावरील भाजीपाला मार्केट, फेरीवाले बंद करण्यात आले आहेत. कंटेंटमेंट झोनमधील भाजी विक्रेते बंद करण्याबाबत आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यालाच अनुसरुन दादर, माहीम , धारावीतील 10 कंटेंटमेंट झोनच्या ठिकाणी मेडिकल वगळता इतर सर्व भाजी, फळ विक्रेते, फेरीवाले बंद ठेवण्यात येणार आहेत.

धारावीतील वाढते कोरोना रुग्ण पाहता पालिकेच्या जी उत्तर वॉर्डने देखील भाजीपाला मार्केट, फेरीवाले बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार माहिम फाटक, बांद्रा व्हॉली रोड, धारावी मेन रोड, धारावी क्रॉस रोड, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, टी एच कटारिया मार्ग, ए के जी नगर, , मदिनानगर, चैत्र नगरी या ठिकाणची भाजी मार्केट बंद राहणार आहेत.

कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये जीवघेणी गर्दी!
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकीकडे लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग सारखे उपाय केले जात असताना कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये मात्र या सगळ्याला हरताळ फसला जात असल्याची धक्कादायक बाब समीर आली आहे. कारण कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये अजूनही जीवघेणी गर्दी पाहायला मिळतेय. कल्याण डोंबिवलीत आत्तापर्यंत कोरोनाचे तब्बल 40 रुग्ण आढळले असून महापालिकेनं गर्दी टाळण्यासाठी कडक उपयोजना राबवायला सुरुवात केलीये. किरकोळ भाजी मंडईचंही मोकळ्या मैदानात स्थलांतर करण्यात आलंय. मात्र दुसरीकडे भाजीपाल्याची घाऊक बाजारपेठ असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये मात्र अजूनही भयंकर गर्दी होत असून हीच गर्दी कल्याण डोंबिवलीकरांसाठी जीवघेणी ठरण्याची भीती व्यक्त होतेय. कारण तुमचा भाजीवाला याच मार्केटमधून भाजी घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे आता किमान आमच्या सुरक्षितेसाठी तरी हे मार्केट बंद करा आणि भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना देण्याची व्यवस्था करा, अशी मागणी थेट कल्याण एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनीच केली आहे.

नवी मुंबईत नियम पायदळी

नवी मुंबई, पनवेलमधील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 50 च्या वर जाऊनही कोणत्याही प्रकारचा फरक येथील नागरिकांना पडताना दिसत नाही. सरकार, पोलीस यंत्रणेकडून वारंवार घरात बसण्याचे आवाहन करूनही वस्तू घेण्याच्या बहाण्याने, सकाळी जाॅगिंग करण्यासाठी लोकं अजूनही मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. त्यामुळे या बाहेर पडणाऱ्या लोकांवर चाप लावण्यासाठी नवी मुंबई पोलीसांनी संध्याकाळी 5 नंतर संपूर्ण मार्केट बंद करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तू असलेली दुकाने सुध्दा 5 वाजेनंतर बंद केली जाणार आहेत.



पुण्यातील मार्केटयार्ड अनिश्चित काळासाठी बंद
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील मार्केटयार्ड अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं आहे. मार्केटयार्ड आडते असोसिएशनने 10 एप्रिलपासून फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याचा घाऊक व्यापार उद्यापासून म्हणजेच 10 एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सर्व परिसर सील करुन कर्फ्यू सुद्धा लावला आहे. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली आहे. मार्केटयार्ड परिसरात सध्या कर्फ्यू लावण्यात आला आहे. मार्केट यार्ड परिसर आणि त्याच्या पूर्वेकडील भाग सील करण्यात आला आहे. इथे फक्त बाहेरुन मालाची आवक होत आहे. तसंच घाऊक व्यापाऱ्यांनाच इथे खरेदीसाठी परवानगी दिली जात आहे. याशिवाय बाहेरुन आलेल्या ट्रक, टेम्पोंना गटागटाने आत प्रवेश दिला जात आहे. कामगार, तोलणार टेम्पो संघटनांचे सर्व सदस्य 10 एप्रिलपासून मार्केटयार्डमध्ये येणार नाहीत. परिणामी इथला चढउतार बंद होणार आहे. त्यामुळे आडते असोसिएशनने 10 एप्रिलपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 10 एप्रिलपासून कोणत्याही प्रकारच्या शेतमालाची आवाक करु नये, असं आडते असोसिएशनने म्हटलं आहे.