Badlapur Crime: बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर शहरातील वातावरण प्रचंड तापले आहे. मंगळवारी सकाळपासून बदलापूरमध्ये पालक आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी संतप्त नागरिकांनी मुलींवर अत्याचार झाला त्या शाळेवर मोर्चा काढला. मात्र, तीन तास उलटून शाळा प्रशासनाकडून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कोणीही पुढे आली नाही. त्यावेळी आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवत मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली. गेल्या काही तासांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन अडकून पडल्या आहेत. पोलिसांनी या आंदोलकांना रेल्वे रुळांवरुन हटवण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलिसांचे एक पथक आंदोलकांना हटवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार करण्याच्या तयारीत होते. मात्र, रेल्वे पोलिसांची तुकडी आपल्या दिशेने येताना दिसताच आंदोलकांनी तुफान दगडांचा मारा केला. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या पथकाने माघार घेत आंदोलकांशी पुन्हा चर्चा करण्याचा मार्ग स्वीकारला.
बदलापूर स्थानकात काहीवेळ दगडफेक झाल्यानंतर आंदोलक पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर ठिय्या देऊन बसले आहेत. तर दुसरीकडे या आंदोलनाचे लोण शहरभरात पसरले आहे. आज सकाळीच बदलापूर बंदची (Badlapur Crime) हाक देण्यात आली होती. मात्र, बदलापूर स्थानकातील आंदोलन तापल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून काही ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस पथकाकडून शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रुट मार्च काढला जात आहे. आंदोलनाचे लोण आणखी पसरु नये, यासाठी बदलापूरमध्ये मोठ्याप्रमाणावर पोलीस फौजफाटा उतरवण्यात आला आहे. त्यामुळे बदलापूर शहराला सध्या पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकात सध्या आंदोलनाचा सर्वाधिक जोर पाहायला मिळत आहे. रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे हे घटनास्थळी हजर आहेत. सरकारने तुमच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आम्हाला तुमच्या भावना समजतात. मात्र, तुमच्या चेंगराचेंगरीत एखाद्याला दुखापत होऊ शकते. त्यामुळे रेल्वे रुळांवरुन बाजूला व्हा, असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले जात आहे. मात्र, आंदोलक माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. शाळेतील लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शाळेसमोरच जाळू, अशी हिंसक भाषा आंदोलक करत आहेत. शाळेच्या परिसरातील असलेल्या आंदोलकांनी शाळेतही तोडफोड केली आहे. या आंदोलकांना काबूत आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळे बदलापूरमध्ये सध्या कमालीची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
आणखी वाचा